बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जिल्ह्याने आर्थिक आणि औद्योगिक क्षेत्रात दमदार झेप घेत निर्यातीमध्ये इतिहास रचला आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये जिल्ह्याची निर्यात तब्बल १,०५१ कोटी रुपयांवर पोहोचली असून, बुलढाणा आता महाराष्ट्रातील उदयोन्मुख निर्यात केंद्र म्हणून ठळकपणे पुढे येत आहे. विशेष म्हणजे अमरावती विभागाच्या एकूण निर्यातीपैकी तब्बल ४७.४ टक्के वाटा एकट्या बुलढाणा जिल्ह्याचा आहे. म्हणजेच विभागातून परदेशात जाणाऱ्या प्रत्येक दोन रुपयांच्या मालामागे जवळपास एक रुपयांचा माल बुलढाण्याचा आहे.
गेल्या पाच वर्षांत जिल्ह्याच्या निर्यातीत थक्क करणारी वाढ झाली आहे. २०२१-२२ मध्ये ४२८ कोटी रुपयांची निर्यात असलेला बुलढाणा २०२५-२६ मध्ये थेट १,०५१ कोटींवर पोहोचला. म्हणजेच पाच वर्षांत तब्बल १४६ टक्क्यांची झेप जिल्ह्याने घेतली आहे. मागील वर्षी ८७४ कोटींची निर्यात झाली होती; यंदा त्यातही २०.३ टक्क्यांची वाढ नोंदली गेली आहे.
अमरावती विभागात बुलढाण्याने सलग अव्वल स्थान कायम ठेवले असून, अकोला ५१९ कोटी, अमरावती ३५० कोटी, यवतमाळ २५७ कोटी आणि वाशीम ४१ कोटी रुपयांवर राहिले. या आकडेवारीने विभागातील बुलढाण्याचे निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे.
कापूस २२३ कोटींसह आघाडीवर असला तरी सुगंधी तेले व सौंदर्यप्रसाधने २२१ कोटी, विविध रासायनिक उत्पादने १३१ कोटी, गळित धान्य व बियाणे १३८ कोटी, तर खाद्य भाज्या व कंदमुळे ११६ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहेत. पारंपरिक शेतीबरोबरच मूल्यवर्धित उत्पादनांनी बुलढाण्याच्या निर्यातीला नवा वेग दिला आहे.
बुलढाणा आता फक्त शेतीप्रधान जिल्हा नाही, तर निर्यातीच्या नकाशावर दमदार ओळख निर्माण करणारा जिल्हा बनत आहे.










