पुणे (हॅलो बुलढाणा/वृत्तसंस्था) फसव्या सरकारने अटी शर्तींचा घोळ घालून केलेली कर्जमाफी फसवी आहे. जोपर्यंत सरसकट कर्जमुक्ती होत नाही तोपर्यंत रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वातील कर्जमुक्तीचा लढा आणखी बळकट आणि राज्यव्यापी करण्याचा निर्धार क्रांतिकारी शेतकरी संघटनेने केला आहे. पुण्यातील कोथरूड येथे क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या राज्यभरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक रविकांत तुपकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेशाध्यक्ष राजकुमार कसबे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी कर्जमुक्तीचा लढा आणखी तीव्र करण्याचा एकमुखी निर्धार पदाधिकाऱ्यांनी केला.आगामी काळात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या संघटनात्मक बांधणीचे अभियान सुरू करायचे आहे, त्याविषयी पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेण्यात आली. बैठकीत राज्यातील काही प्रमुख नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.यात क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी चैत्राली शेलार यांची तर नांदेडच्या हिमायतनगर येथील सौ.पूजा चव्हाण यांची मराठवाडा विभागीय महिला अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
पुण्यातील कोथरूड येथील गणेश हॉल येथे पार पडलेल्या बैठकीला प्रकृती अस्वास्थ्यामुळे रविकांत तुपकर उपस्थित राहू शकले नाही.”रविकांत तुपकर यांनी राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी उभारलेला कर्जमुक्तीचा लढा आता थांबणार नाही. राज्यभरातील शेतकरी क्रांतिकारी शेतकरी संघटनेकडे आश्वासक नजरेने पाहत आहे. तुपकरांच्या नेतृत्वात राज्यभरातील शेतकरी रस्त्यावर उतरेल” असा इशारा प्रदेशाध्यक्ष राजकुमार कसबे यांनी बैठकीत बोलतांना दिला. माँसाहेब जिजाऊंची जन्मभूमी असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातून सुरू झालेल्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा संपूर्ण राज्यभरात विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात विस्तार झाला आहे. पुढील काही दिवसांत संपूर्ण राज्यात जिल्हा आणि तालुकापातळीवर संघटनात्मक बांधणीचे अभियान संघटनेच्यावतीने राबविण्यात येणार असल्याचेही प्रदेशाध्यक्ष राजीवकुमार कसबे म्हणाले. या बैठकीला क्रांतिकारी राज्य समन्वयक सचिन पांडुळे,राज्य कार्याध्यक्ष राजेंद्र मोरे, राज्य उपाध्यक्ष जयवंत दहिभाते,बीड जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे, राज्य कार्यकारणी सदस्य भाऊसाहेब मुंढे, धाराशिव जिल्हाध्यक्ष भास्कर वारे, सांगली जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब शिंदे , युवा नेते श्रीराम चलवाड, सांगली युवा जिल्हाध्यक्ष मयूर गायकवाड, सुनील दाशाल, मल्हारी कांबळे, युवा नेते अजित गडदे, कांतीलाल शिंदे,सोलापूर जिल्ह्याचे युवा नेते शिवराम गायकवाड, अमोल घुमरे,लातूर चे दत्ता किन्हीकर , सावन गवळी,लातूर युवा जिल्हाध्यक्ष प्रज्योत हुडे, विशाल ढोबळे, बिभीषण शिंदे, प्रभाकर मजगे यांच्यासह राज्यभरातून मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.
नव्या नियुक्त्या
सौ.चैत्राली शेलार–धस(संगमेश्वर जि.रत्नागिरी) महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष, सौ.पूजा चव्हाण(हिमायतनगर, नांदेड) मराठवाडा विभागीय महिला अध्यक्ष, राजेंद्र ढमाले (जिल्हाध्यक्ष पुणे शहर),ॲड. अनिल भिलारे (जिल्हाध्यक्ष ,पुणे विधी आघाडी),अमोल बोराडे (जिल्हा उपाध्यक्ष, पुणे शहर), ज्योतिराम पावले(भूम तालुका संघटक), आणि विशाल लोमटे(सातारा,शहर जिल्हाध्यक्ष) या जबाबदाऱ्यांची घोषणा बैठकीत करण्यात आली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक रविकांत तुपकर यांनी अभिनंदन केले आहे.










