spot_img
spot_img

जळगाव जामोदमध्ये मध्यरात्री जुगार अड्ड्यावर पोलिसांचा धडाका! टिनशेडमध्ये रंगला होता ‘एक्का-बादशाह’चा डाव; 80 हजारांचा मुद्देमाल जप्त, 5 जण ताब्यात… 7 ते 8 जण अंधाराचा फायदा घेत पसार!

जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा) शहरात मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांनी जुगार अड्ड्यावर धडक कारवाई करत मोठा डाव उधळून लावला आहे. जळगाव जामोद ते बऱ्हाणपूर रोडलगत असलेल्या स्वोंद धाब्याच्या पाठीमागील टिनशेडमध्ये ताश पत्त्यांवर पैशांच्या हारजितीचा ‘एक्का-बादशाह’ नावाचा जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक सचिन बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने पंचांसह सापळा रचत मध्यरात्री सुमारे 1.10 वाजता छापा टाकला.

पोलिसांचा छापा पडताच जुगार खेळणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. काही जणांनी अंधाराचा फायदा घेत टिनशेडच्या मागील शेतातून पळ काढला, तर पोलिसांनी पाठलाग करून 5 जणांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्यांमध्ये शेख करिम शेख अमीर, दीपक नारायण हिस्सल, वसीम खान मेहमूद खान, शेख गफुर शेख अमीर आणि जावेद खान गुलाब खान यांचा समावेश आहे.

आरोपींच्या अंगझडतीत हजारो रुपयांची रोकड मिळून आली. तसेच डावातील रक्कम मोजली असता 53 हजार 350 रुपये आढळून आले. घटनास्थळावरून एकूण 80 हजार 730 रुपयांचा मुद्देमाल, रोख रक्कम आणि 52 ताश पत्ते पोलिसांनी पंचांसमक्ष जप्त केले. या प्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम 4 व 5 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, अंधाराचा फायदा घेत पसार झालेल्या 7 ते 8 जणांचा पोलीस शोध घेत आहेत. जळगाव जामोद पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध जुगार अड्डे चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!