spot_img
spot_img

प्लॉटचा सौदा, चालकाच्या हातात 4 लाख… अन् मध्येच ‘गेम’! मालकाने फोन केला तर उत्तरं उडवा-उडवीची; जळगाव जामोद पोलिसांत अपहाराचा गुन्हा दाखल

जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा) सिनेमात जशी पैशांची बॅग घेऊन एखादा माणूस अचानक गायब होतो आणि मालकाचे डोके फिरते, तसाच काहीसा प्रकार जळगाव जामोद परिसरात उघडकीस आला आहे. प्लॉटच्या व्यवहारातील उर्वरित रक्कम चालकाच्या हाती देण्यात आली; मात्र ती रक्कम मालकापर्यंत पोहोचलीच नाही. या प्रकरणी 4 लाख रुपयांच्या अपहाराचा गुन्हा जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर येथील हकीमी व्हीला, बीजीटीआय रोड परिसरातील अबीजर शब्बीर हुसेन शाकीर हे बिल्डिंग मटेरियल विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांनी 15 जून 2026 रोजी मलकापूर येथील आपला प्लॉट वरवट बकाल येथील अनिल भावराव बकाल यांना 7 लाख 45 हजार रुपयांत विकण्याचा सौदा केला होता. या व्यवहारात 45 हजार रुपये रोख मिळाले होते, तर उर्वरित रक्कम 27 जून रोजी देण्याचे ठरले होते.

दरम्यान, शाकीर यांच्या लोखंडी मालाची आयशर गाडी क्रमांक MH/20/EG/6640 ही चालक देवेंद्र केशव वानखडे वरवट बकाल येथे घेऊन गेला होता. त्याचवेळी प्लॉट व्यवहारातील उर्वरित रकमेतून 4 लाख रुपये निळकंठ नागोराव बोरडे यांनी चालक देवेंद्र वानखडे यांच्या ताब्यात दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

यानंतर चालक रिकामी गाडी घेऊन मलकापूरकडे निघाला. मात्र दुपारी साडेएकच्या सुमारास मालक अबीजर शाकीर यांनी चालकाला फोन करून पैशांबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. रक्कम कुठे आहे, याबाबत स्पष्ट माहिती देण्याऐवजी तो टाळाटाळ करू लागला. पुढे तो खांडवीजवळ असल्याचे सांगितल्याने शाकीर स्वतः तेथे गेले. मात्र त्या ठिकाणी चालकाने आपल्याकडे कोणतीही रक्कम नसल्याचे सांगितले.

विश्वासाने ताब्यात दिलेल्या 4 लाख रुपयांचा चालक देवेंद्र वानखडे याने अपहार करून आर्थिक नुकसान केल्याचा आरोप अबीजर शाकीर यांनी केला आहे. त्यांच्या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 316(4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाची एफआयआर क्रमांक 0424/2026 असून, एफआयआर 30 जून 2026 रोजी रात्री 9 वाजून 44 मिनिटांनी नोंदविण्यात आली आहे. प्लॉट व्यवहारातील रक्कम चालकाच्या हाती देण्यात आली आणि ती मालकापर्यंत पोहोचलीच नाही, या प्रकारामुळे परिसरातील व्यापारी वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. पुढील तपास जळगाव जामोद पोलीस करीत आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!