मुक्ताईनगर (हॅलो बुलढाणा/करन झनके) मुक्ताईनगर विधानसभाक्षेत्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. चेतन झनके आणि त्यांचे बंधू विशाल झनके हे सोमवारी दुपारी भीषण अपघातातून अक्षरशः थोडक्यात बचावले. मलकापूर येथील काम आटोपून ते मुक्ताईनगरकडे कारने जात असताना महाजन पेट्रोल पंपासमोर, बोदवड रोडवर हा थरारक प्रकार घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे १२.४५ वाजता या भागात रस्ता दुभाजकाचे काम सुरू होते. त्याचवेळी एक ट्रॅक्टर भरधाव वेगाने पुढे गेला आणि काही अंतरावर अचानक थांबला. ट्रॅक्टरच्या मागे असलेल्या झनके बंधूंनी आपली कार क्रमांक MH19 BU 8704 सुरक्षित अंतरावर थांबवली. मात्र समोर जागा नसल्याने ट्रॅक्टर चालकाने मागे-पुढे कोणतीही खात्री न करता थेट ट्रॅक्टर रिव्हर्स घेतला.
कारमधून सतत हॉर्न वाजवण्यात येत होता, परंतु चालकाने कानात हेडफोन घातले असल्याने त्याला हॉर्न ऐकू गेला नाही. विशेष म्हणजे कारच्या मागे ट्रक उभा असल्याने कार मागे घेण्याचाही मार्ग बंद झाला होता. काही क्षणांतच ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे चाक कारच्या बोनेटवर चढले. ट्रॉली बोनेट चिरत थेट पुढील काचेपर्यंत येऊन पोहोचली. काचेपासून अवघ्या अर्ध्या फुटावर ट्रॉली थांबल्याने झनके बंधूंचे प्राण वाचले; अन्यथा मोठी जीवितहानी झाली असती.
या घटनेनंतर परिसरातील नागरिकही हादरले. अवजड वाहनांचा भरधाव वेग, चालकांची निष्काळजीपणा आणि हेडफोन लावून वाहन चालवण्याचा प्रकार किती जीवघेणा ठरू शकतो, हे या अपघातातून पुन्हा स्पष्ट झाले आहे.
यापूर्वीही बऱ्हाणपूर रोडवर भरधाव डम्परच्या धडकेत दोन युवकांचा बळी गेला होता. तरीही प्रशासन आणि वाहतूक नियंत्रण यंत्रणा जागी होणार का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.










