देऊळगाव मही (हॅलो बुलढाणा/ संतोष जाधव) केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत देऊळगाव मही शहरासाठी तब्बल 5 कोटी रुपयांची नळ योजना मंजूर होऊन पाच वर्षांपूर्वी काम सुरू झाले. मात्र ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे आजही हे काम अपूर्णच असल्याने शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, संतापाचा उद्रेक अखेर रस्त्यावर नव्हे तर थेट पाण्याच्या टाकीवर पाहायला मिळाला.
आज 29 जून रोजी सकाळी 8 वाजेपासून ग्रामपंचायत सदस्य संदीप राऊत, अनंता इंगळे यांच्यासह कारभारी देढे, सागर रोतळे, हरि शिंदे यांनी फिल्टर प्लॅन्टवरील पाण्याच्या टाकीवर चढून ‘शोले स्टाईल’ आंदोलन सुरू केले. या आंदोलनामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली. आंदोलनस्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
आंदोलनकर्त्यांनी पाणीपुरवठा विभागाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत तीव्र नाराजी व्यक्त केली. वारंवार लेखी निवेदने देऊनही विभागाने दुर्लक्ष केले, सात दिवसांची मुदत देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही, असा आरोप यावेळी करण्यात आला.
दरम्यान, पाणीपुरवठा विभागाच्या महिला कनिष्ठ अभियंता श्रद्धा बनकर, कनिष्ठ अभियंता आकाश कचरे आणि भूषणकुमार आडे यांनी आंदोलनस्थळी भेट देत आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. जलजीवन मिशन अंतर्गत अपूर्ण राहिलेले काम 2 जुलैपासून सुरू करून फिल्टर प्लॅन्ट टाकीपासून शहरातील वेशीपर्यंत 5.5 किमी पाईपलाईनचे काम पूर्ण करण्यात येईल, तसेच पाणीपुरवठा वितरणातील त्रुटी दूर करून व्यवस्था सुरळीत केली जाईल, असे लेखी आश्वासन देण्यात आले.
यावेळी सरपंच वसुदेव पाटील, ग्रामविकास अधिकारी वसंतराव चेके, शेख जुल्फेकार, माजी सरपंच रामा म्हस्के यांच्यासह ग्रामस्थ व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.










