बुलढाणा (हॅलो बुलढाणा) ग्रामपंचायत रेकॉर्डवर जागेची नोंद स्वतःच्या नावावर करून देण्याच्या मागणीवरून सुरू झालेला वाद थेट धमक्या, बदनामी, उपोषण आणि खंडणीच्या आरोपांपर्यंत पोहोचल्याने बुलढाण्यात खळबळ उडाली आहे. पंचायत समिती मलकापूर येथे विस्तार अधिकारी कृषी पदावर कार्यरत असलेले रविंद्र किसनराव बोबडे यांनी दिलेल्या तोंडी रिपोर्टवरून बुलढाणा शहर पोलिसांनी आरोपी जाकीर मिर्झा बेग शब्बीर बेग रा. धाड/तराडखेड याच्याविरुद्ध अप. क्र. 532/2026 नुसार कलम 221, 356(2), 296, 351(2) BNS अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी बोबडे हे यापूर्वी ग्रामपंचायत धाड येथे ग्रामपंचायत अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यावेळी आरोपीने 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवरील करारनाम्याच्या आधारे जागा आपल्या नावावर नोंदवण्याची मागणी केली. मात्र खरेदीदस्त नसल्याने नोंद होऊ शकत नाही, असे सांगितल्याने आरोपी चिडला आणि तेव्हापासून वेळोवेळी कार्यालयात येऊन वाद घालणे, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, तसेच “मी युट्युब चॅनलचा पत्रकार आहे, तुझी बदनामी करतो” अशा धमक्या देत असल्याचा आरोप आहे.
इतकेच नव्हे तर माहिती अधिकाराखाली वारंवार अर्ज करणे, वरिष्ठांकडे तक्रारी करणे, उपोषणास बसणे आणि सोशल मीडियावर खोटी माहिती टाकून बदनामी केल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. 30 ऑक्टोबर 2025 रोजी पंचायत समिती बुलढाणा येथे सुनावणीनंतर आरोपीने “तुझे पाहून घेतो” अशी धमकी दिल्याचेही नमूद आहे.
फिर्यादीने गंभीर आरोप केला की, या प्रकरणातून वाचायचे असल्यास आरोपीने त्यांच्याकडे तीन लाख रुपयांची खंडणी मागितली. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपीने पुन्हा मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू केले. मात्र चौकशीत फिर्यादीविरुद्ध तथ्य न आढळल्याने उपोषण अवैध असल्याचे कळविण्यात आले.
या संपूर्ण प्रकरणात सरकारी कर्मचाऱ्याला मानसिक त्रास देत शासकीय कामकाजात अडथळा आणल्याचा आरोप असून, बुलढाणा शहर पोलीस पुढील तपास करीत आहेत.










