बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शहरातील त्रिशरण चौक सामाजिक भवन, चिखली रोड येथे एका शिक्षकाचा अचानक मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. जगदेव गजानन शिंपणे वय ५४ वर्ष, रा. धामणदरी गौतम नगर, बुलढाणा असे मृत शिक्षकाचे नाव आहे. ते साखळी खुर्द येथे शिक्षक म्हणून कार्यरत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, त्रिशरण चौक सामाजिक भवन परिसरात त्यांची प्रकृती अचानक खालावली. त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या मृत्यूमागे उष्माघात कारणीभूत आहे की हार्ट अटॅक, याबाबत जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय तपासणी सुरू आहे.
अचानक घडलेल्या या घटनेने शिक्षक वर्गासह परिसरातील नागरिकांत शोककळा पसरली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या धर्मपत्नी या भोकरदन तालुक्यात पेपर देण्यासाठी गेल्या असल्याचे समजते. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, शिंपणे सरांच्या निधनाने साखळी खुर्दसह बुलढाणा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या घटनेमुळे वाढत्या उन्हाचा तडाखा आणि आरोग्याबाबत नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.










