spot_img
spot_img

जळगाव जामोदमध्ये महसूल व पोलिसांची मोठी संयुक्त कारवाई; उमापूर शिवारात बेकायदेशीर मुरुम उत्खनन करणारे जेसीबी जप्त, दोन टिप्पर फरार..!

​जळगाव जामोद (हॅलो बुलडाणा) तालुक्यातील मौजे उमापूर येथे बेकायदेशीरपणे मुरुम उत्खनन करणाऱ्या माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी महसूल आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे धडक कारवाई केली आहे. दिनांक १८ मे २०२६ रोजी मध्यरात्री १२:०० वाजेच्या सुमारास केलेल्या या धाडसी कारवाईत उमापूर शिवारातून मुरुम उत्खनन करत असलेले एक जेसीबी मशीन जप्त करण्यात आले असून, ते जळगाव जामोद पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आले आहे. या कारवाईमुळे अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्या माफियांचे धाबे दणाणले आहेत.​मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, तहसीलदार पवन पाटील आणि जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीनकुमार पाटील यांनी आपल्या पथकासह रात्रीच्या सुमारास मौजे उमापूर येथील गट नंबर २ च्या पूर्व दिशेला छापा टाकला. यावेळी घटनास्थळी ‘जेसीबी’ (क्र. MH 18 BX 0679) द्वारे बेकायदेशीरपणे मुरुमाचे उत्खनन सुरू असल्याचे आणि तिथे दोन टिप्पर उभे असल्याचे अधिकाऱ्यांना आढळून आले.तहसीलदार आणि ठाणेदार यांचा मोठा ताफा अचानक समोर येताच मुरुम वाहतूक करण्यासाठी आलेल्या दोन्ही टिप्पर चालकांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत वाहनांसह तिथून पळ काढला.

टिप्पर दूर अंतरावर असल्याने आणि अंधार असल्यामुळे त्यांचे वाहन क्रमांक समजू शकले नाहीत. मात्र, मुरुम उत्खनन करत असलेले जेसीबी मशीन महसूल व पोलीस प्रशासनाने तत्परता दाखवत जागीच जप्त केले.​सदर धडक कारवाई जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनात तहसीलदार पवन पाटील व ठाणेदार नितीनकुमार पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या पथकात ​महसूल विभागाचे ग्राम महसूल अधिकारी व्ही. एस. शिंदे, व्ही. आर. रहाटे, एस. टी. त्रिभूवन, जी. पी. सोनोने आणि एस. पी. माळोदे यांचेसह ​पोलीस विभागाचे पीएसआय नारायण सरकटे, चालक पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन शेळके आणि पोलीस कॉन्स्टेबल प्रफुल्ल डब्बे.दिनांक ​१९ मे रोजी झालेल्या जप्तीपंचनाम्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून, अवैध उत्खनन करणाऱ्यांविरुद्ध कठोर पावले उचलली जातील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!