spot_img
spot_img

प्रशासकीय उदासीनतेवर आ. श्वेता महाले पाटील यांचा ‘जनता दरबार’चा चाबूक; २७३ तक्रारींवर थेट अॅक्शन!

चिखली (हॅलो बुलढाणा) प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराला लगाम घालत आमदार श्वेता महाले पाटील यांनी घेतलेला ‘जनता दरबार’ सोमवारी (४ मे) तहसील कार्यालयात जोरदार गाजला. तब्बल २७३ तक्रारींची नोंद होताच अनेक प्रकरणांचा जागेवरच निपटारा करण्यात आला, तर उर्वरित तक्रारींसाठी १ जूनची डेडलाईन देत अधिकाऱ्यांना कडक इशारा देण्यात आला.

महसूल, पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या प्रश्नांनी हैराण झालेल्या नागरिकांनी दरबारात थेट हजेरी लावत सातबारा, फेरफार, घरकुल योजना, निराधार अनुदान, पाणीपुरवठा, रस्ते व करसंबंधित तक्रारी मांडल्या. आमदार महाले पाटील यांनी प्रत्येकाची तक्रार ऐकून संबंधित अधिकाऱ्यांना तातडीच्या कारवाईचे आदेश दिले.

दरबारात सर्वाधिक खळबळ उडाली ती घरकुल योजनेत लाच मागितल्याच्या तक्रारींमुळे. संतप्त आमदारांनी संबंधित कर्मचाऱ्यांना समोरच फैलावर घेत, “गरिबांच्या हक्कावर डल्ला मारणाऱ्यांना नोकरीत जागा नाही,” असा कडक इशारा दिला. यामुळे प्रशासनात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये दिलासा पसरला आहे.

तसेच पीएम किसान सन्माननिधीचे हप्ते अचानक बंद झाल्याच्या तक्रारींवरही त्यांनी तात्काळ लक्ष घालत पात्र लाभार्थ्यांना योजना अखंड सुरू ठेवण्याचे आदेश दिले. “जनतेची सेवा हीच खरी जबाबदारी,” असे ठणकावत १ जूनपर्यंत सर्व प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याचे निर्देश देण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सरकार नागरिकांपर्यंत’ या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवत चिखलीत सुशासनाची नवी परंपरा सुरू झाल्याचे चित्र दिसले. दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी हा जनता दरबार नियमित होणार असून, पहिल्याच उपक्रमाने प्रशासनाला धक्का देत जनतेत विश्वास निर्माण केला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!