चिखली (हॅलो बुलडाणा/ सय्यद साहिल) चिखली शहरात मोटारसायकल चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असताना चिखली पोलिसांच्या डी.बी. पथकाने धडक कारवाई करत अवघ्या काही दिवसांत मोटारसायकल चोरट्याला जेरबंद केले आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे.
दिनांक २० जानेवारी २०२६ रोजी चिखली येथील विश्रामगृहासमोर उभी असलेली हिरो कंपनीची HF डिलक्स (MH 28 AW 2521) अज्ञात चोरट्याने लंपास केली होती. याप्रकरणी २७ जानेवारी रोजी तक्रार दाखल होताच चिखली पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक ७६/२०२६, कलम ३०३ (२) भा. न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस निरीक्षक भुषण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाने गुप्त माहितीच्या आधारे जालना जिल्ह्यातील भारज बु. येथे सापळा रचला. संत सावता माळी भवनाजवळ संशयिताच्या घरासमोरच चोरीची मोटारसायकल उभी आढळली. चौकशीत कृष्णा आत्माराम पवार (वय २४) याने उडवाउडवीची उत्तरे दिली; मात्र इंजिन व चेचिस नंबर तपासल्यावर वाहन चोरीचे असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.
आरोपीला अटक करून मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.











