बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शिक्षणाच्या राजकारणीकरणाचा बुरखा टरटर फाडत नागपूर खंडपीठाने राज्य शासनाला जबर झटका दिला आहे. तीन महिन्यांपासून रखडवलेली अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणक शाखेतील ६० जागांची मंजुरी अखेर न्यायालयाच्या आदेशानंतर अवघ्या २ तासांत द्यावी लागली आहे.
न्यायालयाने राज्य शासनाला फटकारताना स्पष्ट केले की, परवानगी नाकारण्यामागे एकही समाधानकारक कारण नव्हते. इतकेच नव्हे, तर संचालक तंत्रशिक्षण आणि संबंधित सचिवांवर दंडात्मक कारवाईचा इशाराही न्यायालयाने दिला. ही संपूर्ण बाब केवळ राजकीय सूडभावनेतून केल्याचे उघड होत असून, मतदारसंघातील सत्ताधाऱ्यांकडून संस्थांवर दबाव आणून द्वेषाचे राजकारण केल्याचा आरोप करण्यात आला. अनुराधा अभियांत्रिकीची बाजू उच्च न्यायालयात सीनियर कौन्सिल अॅड. कप्तान यांनी प्रभावीपणे मांडली. न्यायालयाच्या निर्णयामुळे संस्थेला आणि हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्यास दिलासा मिळाला आहे.न्यायालयाने सत्याला साथ दिली. सत्ताधाऱ्यांनी गोरगरीब विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ मांडला होता, पण आम्ही न्यायासाठी लढा दिला आणि विजय मिळवला, अशी तीव्र प्रतिक्रिया राहुल बोंद्रे माजी आमदार व संस्थाध्यक्ष यांनी दिली आहे.