मेहकर (हॅलो बुलडाणा) ग्रामीण भागाचा विकास व्हावा, यासाठी शासनाच्या विविध योजना असल्या तरी अनेक प्रश्न या गावात रुतलेले असतात. त्याची सोडवणूक जलदगतीने कशी होईल, यासाठी आमदार सिद्धार्थ खरात यांनी ‘फक्त नावापुरते दत्तक नाही, ही माझी सामाजिक जबाबदारी’ असल्याचे सांगून मेळ जानोरी गाव दत्तक घेतल्याची घोषणा करीत गावकऱ्यांच्या वेदनेवर फुंकर मारण्याचा प्रयत्न केला आहे.
कोणतेही काम असो ते शासकीय पद्धतीने करण्यास गेले तर त्यात ती गती येत नाही. पण, या कामांना सामाजिक जाणीवेची जोड दिली तर त्यात आपलेपण येते. हीच गोष्ट आम.सिद्धार्थ खरात यांनी हेरली.दत्तक गाव म्हणजे केवळ कागदोपत्री नातं नव्हे, ती माझी जबाबदारी आहे! असा ठाम पवित्रा मेहकर-लोणार मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी २९ जून रोजी घेतला. आपल्या दत्तक घेतलेल्या अत्यंत दुर्गम अशा मेळ जानोरी गावाला दौरा देऊन त्यांनी लोकांच्या दुःखात सहभाग घेतला.
डोंगर-दऱ्यांच्या कुशीत वसलेले
मेळ जानोरी हे गाव नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसात मोठ्या नुकसानीला सामोरे गेले. २५ व २६ जून रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती, रस्ते, घरांचे मोठे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर आमदार खरात यांनी थेट गावात जाऊन पंचनाम्याची पाहणी केली आणि प्रशासनाला तत्काळ मदतीचे आदेश दिले. यावेळी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक हे सर्व अधिकाऱ्यांचे पथक गावात उपस्थित होते. शिवाय शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे प्रा. आशिष रहाटे (उपजिल्हा प्रमुख), निंबाभाऊ पांडव (तालुका प्रमुख), किशोर गारोळे (शहराध्यक्ष), ॲड. संदीप गवई यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.