बुलढाणा (हॅलो बुलडाणा) भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते स्व. पंकज देशमुख यांच्या मृत्यूमागे आत्महत्या नव्हे, तर एका मोठ्या कटाचा भाग होता, अशी चर्चा बुलढाणा जिल्ह्यात जोर धरत आहे. ही घटना जळगाव जा. मतदारसंघापुरती मर्यादित न राहता आता हळूहळू संपूर्ण जिल्ह्यातील जनतेच्या चर्चेचा विषय बनत चालली आहे. गावागावांत, चौकाचौकांत दबक्या आवाजात होणाऱ्या चर्चा आता एकदिवस मोठा स्फोट घडवून आणल्याशिवाय राहणार नाहीत, हे निश्चित!
जळगाव जामोद हा मतदारसंघ जातीय समीकरणांनी ग्रासलेला असला तरी येथील जनता शाहू, फुले, आंबेडकर विचारांची आहे. येथे कुठल्याही जातीमधील संघर्ष कधीही उफाळून येत नाही. मात्र गेल्या काही वर्षांत इथं सत्तेच्या हव्यासापोटी काही आका-बाका लोक तयार झाले असून, हेच लोक समाजात विष पेरून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत.मागे नागझरीतील कराळे विद्यार्थी हत्या, आणि एका मराठा नेत्याच्या हत्येचा कट – हे सर्व प्रकार एका नात्याने जोडलेले दिसत आहेत. यात कोणत्या “बोक्याला” राजकीय पाठबळ आहे, हे सर्वच जानत्या जनतेला ठाऊक आहे. उद्या या आकांमुळे कोणाचेही नाव त्यांच्या हिटलीस्टमध्ये येणार नाही, याची शाश्वती नाही!
जळगाव जा.ही पवित्र भूमी आहे – संत सखाराम महाराज, महाशिद्ध बाबाजी, संत गजानन महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली! भाई के. आर. पाटील यांच्या विचारांनी प्रेरित जनता या भूमीत वास्तव्यास आहे. अशा ठिकाणी फक्त निवडणुकीच्या काळात जातीमध्ये फूट टाकून, सत्ता मिळवण्यासाठी निष्पाप लोकांना बळी देण्याचे षडयंत्र थांबवलेच पाहिजे.अशी आक्रमक प्रतिक्रिया शिवसेना तालुका प्रमुख अजय पारसकर यांनी सोशल मीडियाद्वारे दिली आहे
स्व. पंकज देशमुख यांच्या मृत्यूतील सत्य बाहेर येण्यासाठी ज्यांच्याकडे माहिती आहे त्यांनी आता पुढे येऊन न्यायलढ्याला हातभार लावावा, ही काळाची गरज आहे. अन्यथा उद्या हा विषारी प्रवाह कुणालाही गिळंकृत करू शकतो!