बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन येथील जिल्हा अधिक्षक कृषीअधिकारी यांच्या कार्यालयासमोर आज 11 जून रोजी जिल्हा भरातील शेतकऱ्याच्या वतीने संभाजी ब्रिगेड जिल्हा कार्याध्यक्ष पांडुरंग पाटील यांच्या नेतृत्त्वात रक्तदान आंदोलन करून शासन व प्रशासनाचा निषेध करण्यात आला.
शासकीय व प्रशासकीय व्यवस्थेने कायम शेतकरी वर्गाचे रक्त शोषण्याचे काम केले. त्यामुळे आता त्यांच्याच दारात न्यायासाठी शेतकरी रक्त देणार असल्याचे म्हणत आंदोलकांनी रक्तदान आंदोलन केले. सरकारने आश्वासन देवून ही शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत. प्रामुख्याने शेतकरी कर्जमाफी,मागील वर्षीचे कृषीमंत्री यांनी मान्य केलेले येलो मोझॅक सहीत सर्वच शेतकऱ्यांचे पिकविमे तत्काळ जमा करणे,एक रुपयात विमा योजना बंद करण्याचा निर्णय मागे घेणे व इतर मागण्यासाठी आज रक्तदान आंदोलन करण्यात आले. यावेळी रक्तदान ऐच्छिक स्वरूपाचे होते परंतु आपल्या शेतकरी बापाच्या सन्मानार्थ शेतकऱ्यांच्या पोरांनी आवर्जुन सहभागी होत रक्तदान केले.