spot_img
spot_img

‘भीम आर्मी’चे स्वातंत्र्यदिनी आत्मदहन आंदोलन ! -प्रशासनाने शब्द फिरविल्याने चढणार जिल्हा परिषदेच्या इमारतीवर!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) विद्यार्थीहिताच्या विविध मागण्यां बाबत भीम आर्मीच्या वतीने जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. केलेल्या चर्चेनुसार सर्व मागण्या त्वरेने निकाली काढतो, असा शब्द दिला. अखेर आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्र दिलेल्या अवधीनंतरही कार्यवाहीची ठोस पावले उचलण्यात आली नसल्याने स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्टला जिल्हा परिषदेच्या इमारतीवर चढून आत्मदहन आंदोलन करण्यात येईल, या आंदोलनावर आपण ठाम असल्याचे सतीश पवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले.

जिल्हा परिषद शाळांचा दर्जा सुधारावा, ग्रामीण भागातील अथवा आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या जाती समूहातील मुलांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी वारंवार विविध निवेदनांच्या माध्यमातून भीम आर्मीने जि.प. प्रशासनाकडे पाठपुरावा केला. आंदोलन केल्याने प्रशासन वेठीस धरल्या जाईल, या भीतीपोटी मागण्या मान्य करण्याचे आश्वासन देत आंदोलन मागे घेण्याची विनंती करण्यात आली होती. पुढे सीईओ कुलदीप जंगम यांच्याकडून कोणतीही ठोस अथवा निर्णायक कार्यवाही केल्याचे दिसून आले नाही. अद्यापही विद्यार्थ्यांना शालेय गणवेश देण्यात आले नाहीत. गणवेशाचे कापड तालुक्यांच्या ठिकाणी धूळखात पडून आहे. स्वातंत्र्यदिनी गणवेश मिळतील की नाही, यात शंका आहे. शासन व प्रशासन गरिबांच्या मुलांना अशी भेदभावाची वागणूक का देत आहे, हे अनाकलनीय आहे, असा सवाल सतीश पवार यांनी केला आहे. २२ जुलै २०२४ रोजी दिलेल्या पत्रामध्ये शिक्षकांचे आवश्यक त्या ठिकाणी समायोजन करण्यासंदर्भात स्पष्ट माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे याबाबतीतदेखील संभ्रम कायम आहे. शिक्षकांची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शब्द देऊनही शैक्षणिक समस्या दूर करण्याबाबत हालचाली होत नसल्याने सतीश पवार यांनी प्रशासनाप्रती संताप व्यक्त केला आहे.
विद्यार्थ्यांना १२ ऑगस्टपर्यंत शालेय गणवेश द्यावे, आवश्यक तेथे शिक्षकांच्या बदल्या करून समायोजन करावे, देयके भरून शाळांचा खंडित केलेला वीजपुरवठा पूर्ववत करावा, केवळ राजकीय वरदहस्तामुळे एकाच जागेवर ठाण मांडणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या करा, विद्यार्थ्यांकडून शाळांची साफसफाई न करता शिपाई किंवा तत्सम कर्मचारी नेमावेत, या मागण्यांची १२ ऑगस्टपूर्वी पूर्तता करावी; अन्यथा गरिबांच्या विद्यार्थ्यांचे भविष्य खराब करणाऱ्या प्रशासनाविरोधात १५ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद इमारतीवर चढून आत्मदहन आंदोलन करण्यात येईल, असा सज्जड इशारा भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांनी दिला आहे.

▪️हा आमच्या अस्तित्वाचा लढा!

प्रशासनाने पोलीस बळाचा वापर करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केल्यास किंवा अटक केल्यास कारागृहातदेखील अन्नत्याग आंदोलन करण्यात येईल. यादरम्यान काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास प्रशासन जबाबदार असेल. हे आंदोलन केवळ स्टंट नसून आमच्या अस्तित्वाचा लढा असल्याचे सतीश पवार यांनी प्रशासनाला ठणकावून सांगितले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!