spot_img
spot_img

STATE NEWS! ठाण्याच्या संविधान चौकातून सपकाळांचा एल्गार! ‘देशाचा कारभार संविधानावरच चालला पाहिजे!’मतचोरीचा आरोप, पेपरफुटीवर सवाल अन् शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला घेरलं!

ठाणे (वृत्तसंस्था/हॅलो बुलढाणा) ठाण्याच्या संविधान चौकातून काँग्रेसने संविधान रक्षणाचा एल्गार पुकारला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी डॉ. सिरीवेल्ला प्रसाद यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यस्तरीय ‘संविधान बचाव रॅली’ पार पडली. देशाचा कारभार भारतीय संविधानावरच चालला पाहिजे, अशी ठाम भूमिका मांडत सपकाळ यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेवर टीका केली.

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान भारतीय लोकशाहीचा आधार आहे. समता, बंधुता, सामाजिक न्याय आणि स्त्री-पुरुष समानता या मूल्यांचे रक्षण करणे प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे सपकाळ म्हणाले. संविधानवादी आणि मनुवादी विचारधारेतील संघर्षाचा मुद्दाही त्यांनी भाषणात उपस्थित केला.

रॅलीत काँग्रेसने मतचोरीचा आरोप करत मतदारांच्या हक्कांवर सवाल उपस्थित केले. पेपरफुटी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याची टीकाही केली. महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्था, वाढती गुन्हेगारी, भ्रष्टाचार आणि जनतेच्या पैशांची उधळपट्टी या मुद्द्यांवरून काँग्रेसने राज्य सरकारला घेरले. शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार आणि वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेसचा संघर्ष सुरूच राहील, असा निर्धार सपकाळ यांनी व्यक्त केला.

रॅलीला काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य बाळासाहेब थोरात, विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील, माजी मंत्री नसीम खान, खासदार प्रणिती शिंदे, शोभा बच्छाव, चंद्रकांत हंडोरे, आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्यासह राज्यभरातून आलेले पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!