चिखली (हॅलो बुलढाणा/सैय्यद साहिल) मेडिकलचे २४,१२७ रुपये ऑनलाइन भरले. हॉस्पिटलच्या ११ हजारांच्या बिलापैकी १० हजार दिले. उरलेले हजार रुपये काही वेळात देऊ, असं सांगितलं… आणि त्यावरून सुरू झालेला वाद थेट पोलिस ठाण्यात पोहोचला! चिखलीच्या योगीराज हॉस्पिटलमध्ये पतीला चापट-बुक्क्यांनी मारहाण केली आणि मध्ये पडल्यावर आपला नकाब ओढला, असा आरोप हिना परवीन शेख शाहरुख (२६) यांनी फिर्यादीत केला आहे.
फिर्यादीनुसार, सर्पदंश झाल्याने हिना यांचे भाऊ सय्यद मोहीब यांना २५ नोव्हेंबरला रुग्णालयात दाखल केले होते. दुसऱ्या दिवशी त्यांना सुट्टी मिळणार असल्याने हिना आणि त्यांचे पती शेख शाहरुख रुग्णालयात गेले. दुपारी दोन ते अडीचच्या सुमारास केबिनमधून भांडणाचा आवाज आला. आत गेल्यावर डॉक्टर पतीला मारहाण आणि शिवीगाळ करत असल्याचे दिसले, असे हिना यांनी तक्रारीत म्हटले आहे.
पतीला मारहाण करू नका, असे सांगताच डॉक्टरांनी आपल्याला ढकलले आणि चेहऱ्यावरील नकाब ओढला. त्यात मानेवर ओरखडा पडला, असा आरोपही त्यांनी केला. वाद सोडवायला आलेल्या भावालाही धक्काबुक्की आणि शिवीगाळ झाली, तसेच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली, असे फिर्यादीत नमूद आहे.
चिखली पोलिसांनी २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.२१ वाजता रुग्णालयाचे संचालक सुहास खेडेकर यांच्यासह दोघांविरुद्ध गुन्हा क्र. १०४५/२०२६ नोंदवला. भारतीय न्याय संहितेची कलमे ७४, ११५(२), ३५१(२), ३५२ आणि ३(५) लावण्यात आली आहेत. तपास हेड कॉन्स्टेबल विजय प्रकाश गिते यांच्याकडे आहे.
‘माझ्या अंगावर बिल फेकलं’
खेडेकर यांनी फोनवरून प्रतिआरोप केला. बिलात आधीच कपात केली होती. तरीही रुग्णाच्या नातेवाइकांनी वाद घातला, आपल्या अंगावर बिल फेकले आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केली, असा त्यांचा दावा आहे. “रुग्णालयात आणि केबिनमध्येही सीसीटीव्ही आहे. फुटेज पोलिसांना देईन. ही अॅक्शनची रिअॅक्शन होती,” असे खेडेकर म्हणाले. केबिनमध्ये नेमकं काय घडलं, याचा उलगडा आता पोलिस तपासातून होणार आहे.





Total Users : 3830242