spot_img
spot_img

विरोधकांना घेरायला आले, पत्रकारांच्या प्रश्नांनीच घेरले! चिखलीत सत्ताधाऱ्यांच्या पत्रकार परिषदेवर बहिष्कार!

चिखली (हॅलो बुलढाणा/सैय्यद साहिल) विरोधकांचे आरोप खोडून काढण्यासाठी बोलावलेल्या सत्ताधारी भाजप-शिवसेनेच्या पत्रकार परिषदेत आयोजकांनाच प्रश्नांच्या सरबत्तीला सामोरे जावे लागले. स्पष्ट उत्तरे मिळत नसल्याचा आक्षेप घेत पत्रकारांनी परिषदेतून बहिष्कार टाकत सभागृह सोडले. विरोधकांना प्रत्युत्तर देण्याच्या तयारीने आलेल्या सत्ताधाऱ्यांसमोर स्वतःचीच बाजू स्पष्ट करण्याचे आव्हान उभे राहिले.

श्रीराम नागरी पतसंस्थेच्या सभागृहात आयोजित परिषदेला नगराध्यक्ष पंडितराव देशमुख गैरहजर होते. नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेतील कामकाजावर आरोप होत असताना नगराध्यक्षांची अनुपस्थिती ठळकपणे जाणवली. निर्णयांबाबत खुलासा करण्याची जबाबदारी नेमकी कोण घेणार, असा प्रश्न यावेळी उपस्थित झाला.

भाजप शहराध्यक्ष सागर पुरोहित यांनी सत्ताधाऱ्यांची बाजू मांडली. मात्र, १८ नोव्हेंबरच्या सर्वसाधारण सभेत अवघ्या पाच ते दहा मिनिटांत २१ ठराव मंजूर केल्याच्या आरोपावर पत्रकारांनी स्पष्टीकरण मागितले. सभेतील गोंधळ आणि कथित नियमबाह्य कामकाजाबाबतही प्रश्न विचारण्यात आले. थेट उत्तरांऐवजी विषयांतर आणि उडवाउडवी होत असल्याची नाराजी पत्रकारांनी व्यक्त केली.

सत्ताधारी नगरसेवकांपैकी एक जण गैरहजर असताना ठराव कसे मंजूर झाले? बॉम्बे मार्केटच्या बांधकामासंबंधी ठरावाचा आधार काय? रोहिदास नगर आणि भीम नगरमधील नागरिकांच्या घरकुलासाठी भूखंडपट्ट्यांचे काय झाले? सर्वसाधारण सभा दरमहा नियमित का होत नाही? अशा प्रश्नांची सरबत्ती झाली. मात्र, समाधानकारक खुलासा मिळाला नसल्याचे पत्रकारांचे म्हणणे होते.

परिषदेला सुहास शेटे, रामदासभाऊ देवडे, कपिल खेडेकर, विष्णू जोगदंडे आणि दत्ता सुसर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. तरीही प्रश्नांवरील स्पष्टतेचा अभाव कायम राहिल्याची नाराजी व्यक्त झाली. विशेष म्हणजे, तयार करण्यात आलेली प्रेस नोटही पत्रकारांना वितरित करण्यात आली नाही.

प्रश्नोत्तरे सुरू असतानाच पुरोहित यांनी परिषद संपल्याचे जाहीर केल्याने वाद चिघळला. ‘उत्तरे द्यायची नसतील, तर पत्रकार परिषद कशासाठी?’ असा सवाल पत्रकारांनी केला. आणखी प्रश्न विचारायचे असल्याचे सांगूनही परिषद संपविल्याच्या निषेधार्थ पत्रकार बाहेर पडले.

विरोधकांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी मिळालेल्या व्यासपीठावर सत्ताधाऱ्यांकडून ठोस खुलासा अपेक्षित होता. मात्र, परिषद संपल्यानंतरही सभेचे कामकाज आणि शहरातील प्रश्नांबाबतची उत्तरे अनुत्तरितच राहिल्याची नाराजी कायम होती. आता चिखलीकरांच्या प्रश्नांना स्पष्ट उत्तरे मिळणार तरी कधी?

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!