spot_img
spot_img

EXCLUSIVE! वडिलांच्या हातात पाना… लेकीच्या हाती मेट्रोची कमान! खामगावच्या ‘प्रेरणा’ची पुण्यात दमदार झेप!गॅरेज व्यावसायिकाची लेक बनली मेट्रो पायलट; जिजाऊंच्या भूमीतील कर्तृत्वाला सलाम!

खामगाव (हॅलो बुलढाणा) वडील दुचाकी दुरुस्तीसाठी गॅरेजमध्ये घाम गाळत असताना लेकीने शिक्षणाच्या बळावर थेट मेट्रोच्या केबिनपर्यंत झेप घेतली! खामगाव तालुक्यातील सुटाळा खुर्द येथील प्रेरणा परमेश्वर चोपडे हिने पुणे मेट्रोच्या ‘पिंक लाईन ३’वर मेट्रो पायलट म्हणून जबाबदारी स्वीकारत बुलढाणा जिल्ह्याच्या अभिमानात भर घातली आहे.

 

प्रेरणाचे वडील परमेश्वर सुखदेव चोपडे यांचे खामगावातील नांदुरा रोडवरील गायकवाड हॉस्पिटलजवळ दुचाकी दुरुस्तीचे गॅरेज आहे. आई सौ. छाया चोपडे यांनी कुटुंबाला खंबीर साथ दिली. सर्वसामान्य परिस्थितीतही आई-वडिलांनी मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य दिले. प्रेरणाने त्यांच्या कष्टाचे चीज करत स्वतःच्या जिद्दीने यशाचा मार्ग खुला केला.

माऊली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर प्रेरणाने निवडीचे विविध टप्पे आणि काटेकोर प्रशिक्षण यशस्वीपणे पार केले. तांत्रिक कौशल्य, शिस्त आणि जबाबदारीच्या जोरावर तिने मेट्रो पायलटपदापर्यंत मजल मारली.

उपलब्ध माहितीनुसार, महिला पायलटमार्फत संचालित होणाऱ्या या मार्गिकेवरील उद्घाटनानंतरची पहिली प्रवासी सेवा चालविण्याचा बहुमानही प्रेरणाला मिळाला. प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासाची धुरा सांभाळणारी ही लेक आज परिसरातील मुलींसाठी प्रेरणास्थान ठरत आहे.

चोपडे कुटुंबातील शिक्षणाची वाटचाल पुढे सुरू आहे. प्रेरणाचा भाऊ मंथन मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात, तर बहीण शिवानी याच शाखेच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे.

परिस्थिती सर्वसामान्य असली, तरी स्वप्नांची उंची कमी असण्याचे कारण नाही, हे प्रेरणाच्या प्रवासाने दाखवून दिले आहे. तिच्या यशाबद्दल खामगावसह परिसरातून चोपडे कुटुंबीयांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

राष्ट्रमाता जिजाऊंच्या जिल्ह्यातील या लेकीने मेहनत करणाऱ्या आई-वडिलांच्या स्वप्नांना बळ दिले आहे. गॅरेजमधील कष्टांपासून मेट्रोच्या सारथ्यापर्यंत पोहोचलेली ही कहाणी शिक्षणासाठी धडपडणाऱ्या प्रत्येक कुटुंबाचा उत्साह वाढवणारी आहे. तिच्या वाटचालीतून ग्रामीण भागातील मुलींनाही तांत्रिक क्षेत्रात करिअर घडविण्याची नवी उमेद मिळत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!