spot_img
spot_img

धाड-जामठीची वाट खड्ड्यांत! दुरुस्तीला विलंब झाला तर धाडमध्ये ‘रास्ता रोको’! आठ ते दहा किलोमीटरचा प्रवास धोकादायक, जीवितहानी झाल्याचाही दावा; शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांचे बांधकाम विभागाला निवेदन

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बुलढाणा धाडहून जामठीकडे निघालं की आठ ते दहा किलोमीटर खड्डे चुकवतच गाडी हाकावी लागते. बुलढाणा तालुक्यातील धाड–जामठी–दहीद फाटा रस्त्याची दुरवस्था आता वाहनचालकांच्या जिवावर बेतत असल्याचा मुद्दा शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपस्थित केला आहे. खड्ड्यांमुळे अपघात वाढले असून जीवितहानीही झाल्याचे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी सांगितले. रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करा, अन्यथा धाड येथे रास्ता रोको करू, असा इशारा त्यांनी दिला.

धाड-जामठीचा हा मार्ग पुढे गिरडामार्गे थेट मलकापूरपर्यंत जातो. गावागावांना जोडणाऱ्या या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने नागरिक, वाहनचालक आणि शेतकऱ्यांना रोजच्या ये-जा करताना त्रास सहन करावा लागत आहे. प्रवासाची गैरसोय आणि अपघातांचा धोका लक्षात घेऊन धाड ते दहीद फाट्यापर्यंतच्या रस्त्याची तातडीने सुधारणा करावी, अशी मागणी बुधवत यांनी केली.

यासंदर्भात बुधवत यांनी आज सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जितेंद्र काळे यांची भेट घेऊन लेखी निवेदन दिले. दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेऊन वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत करावी, अशी मागणी त्यांनी अभियंत्यांकडे मांडली. या भेटीत शिवसेनेचे जिल्हा समन्वयक गजानन धांडे, बुलढाणा तालुकाप्रमुख विजय इतवारे आणि किसान सेनेचे उपजिल्हाप्रमुख गजानन उबरहंडे उपस्थित होते.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!