spot_img
spot_img

EXCLUSIVE! शेतात पीक गेलं, डोक्यावर कर्ज उरलं… काकणवाड्यातून रविकांत तुपकरांचा सरकारला थेट इशारा! ‘शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका… मंत्र्यांना रस्त्यावर फिरणेही कठीण होईल!’

संग्रामपूर (हॅलो बुलढाणा) “शेतात पिकलं नाही, जे पिकलं त्याला भाव नाही आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे. शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका,” अशा शब्दांत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक रविकांत तुपकर यांनी सरकारवर हल्लाबोल केला. दुष्काळ संघर्ष यात्रेच्या चौथ्या दिवशी, १७ नोव्हेंबरच्या रात्री संग्रामपूर तालुक्यातील काकणवाडा बुद्रुक येथे झालेल्या एल्गार सभेत ते बोलत होते. “सरकारने पुढील काही दिवसांत निर्णय घेतला नाही, तर महाराष्ट्रभर आंदोलन उभं करू. मंत्र्यांना रस्त्यावर फिरणंही कठीण होईल,” असा इशारा त्यांनी दिला.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना क्षेत्राची मर्यादा न लावता हेक्टरी एक लाख रुपये द्यावेत, अशी मागणी तुपकरांनी केली. उत्पादनखर्च वाढत असताना शेतमालाला भाव मिळत नसल्याचा मुद्दा मांडत त्यांनी कापसाला प्रतिक्विंटल १५ हजार, तर सोयाबीनला १२ हजार रुपये भाव मागितला. कापूस आणि सोयाबीनची आयात थांबवावी, कापसावरील आयात शुल्क ३० टक्क्यांपर्यंत वाढवावे आणि सोयाबीनच्या निर्यातीला चालना द्यावी, अशीही मागणी त्यांनी केली.

सरसकट कर्जमुक्तीत पुनर्गठित कर्जांचा समावेश करा, नियमित कर्जफेड करणाऱ्यांना दोन लाख रुपयांचे प्रोत्साहन अनुदान द्या आणि नव्या पीककर्जाच्या आड येणाऱ्या सिबिलच्या अटी दूर करा, अशी भूमिका तुपकरांनी मांडली. पीकविम्याची संपूर्ण नुकसानभरपाई देण्यासह मायक्रोफायनान्स कंपन्यांच्या कथित सक्तीच्या वसुलीला आळा घालण्याची मागणीही त्यांनी केली. दुष्काळाने शेतीची कामे घटल्याने रोजगार गमावलेल्या शेतमजूर व भूमिहीन कुटुंबांसाठी विशेष आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी त्यांनी सभेत लावून धरली.

चौथ्या दिवशी लाडनापूरपासून सुरू झालेली यात्रा टुनकी, आलेवाडी, बावनबीर, एकलारा, कोद्री, उकळी, आवार आणि वानखेडमार्गे काकणवाड्यात पोहोचली. गावोगावी महिलांनी औक्षण करून यात्रेचे स्वागत केले, तर शेतकऱ्यांनी कर्ज, पीकविमा आणि वसुलीच्या अडचणी मांडल्या.

१४ नोव्हेंबरला मलकापूरहून निघालेली यात्रा जिल्ह्यातील तेराही तालुक्यांतून जाणार आहे. ४ डिसेंबरला बुलढाण्यात एल्गार महामोर्चाने यात्रेचा समारोप होणार असून, त्यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!