मलकापूर (हॅलो बुलढाणा/करन झनके) राकेश तलरेजा यांच्यावर झालेल्या ॲसिड हल्ल्याने मलकापुरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी शुक्रवार, २० नोव्हेंबर रोजी शहरातील व्यापारी प्रतिष्ठाने दिवसभर बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी आणि सामाजिक संघटनांच्या बैठकीत घेण्यात आला. त्याच दिवशी मूक मोर्चा काढून तलरेजा यांना न्याय मिळावा आणि हल्ल्यातील आरोपींना तातडीने अटक करावी, अशी मागणी प्रशासनाकडे केली जाणार आहे.
बाजारपेठ बंद ठेवून नोंदवणार निषेध
हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर व्यापारी आणि सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. बैठकीत घटनेचा तीव्र निषेध करत आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली. शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी दिवसभर आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून निषेधात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. शांततेच्या मार्गाने मूक मोर्चा काढून नागरिकांचा संताप आणि न्यायाची मागणी प्रशासनापर्यंत पोहोचवली जाणार आहे.
तपासाला गती द्या, आरोपींना तातडीने अटक करा!
कारवाईला विलंब होत असल्याची चर्चा शहरात असून, त्यावरून नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. ॲसिड हल्ल्यासारख्या गंभीर घटनेचा तपास कोणत्या टप्प्यावर आहे आणि आरोपींना अटक कधी होणार, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलिसांनी तपासाला गती द्यावी, आरोपींना तातडीने अटक करावी आणि त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी ठाम भूमिका बैठकीत मांडण्यात आली. या घटनेनंतर शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न ऐरणीवर आला असून, प्रशासनाने त्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली.
न्याय मिळेपर्यंत एकजुटीने आवाज उठवणार
बैठकीला व्यापारी संघटना, चेंबर ऑफ कॉमर्स, सिंधी समाज आणि विविध सामाजिक क्षेत्रांतील पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. तलरेजा यांना न्याय मिळेपर्यंत एकजुटीने आवाज उठवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. व्यापारी संघटना, चेंबर ऑफ कॉमर्स, सिंधी समाज आणि मित्रपरिवाराच्या वतीने मलकापूरकरांना बंद आणि मूक मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आता २० नोव्हेंबरच्या बंदला शहरातून किती प्रतिसाद मिळतो आणि आरोपींच्या अटकेच्या मागणीवर पोलीस काय पावले उचलतात, याकडे मलकापूरकरांचे लक्ष लागले आहे.













Total Users : 3785422