जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा/ज्ञानदेव राजनकर) वारंवार फोन करून प्रेमाचा आग्रह, त्यानंतर भेटायला येण्यासाठी दबाव आणि भेटली नाहीस तर स्वतःच्या जीवाचे बरेवाईट करीन, अशी धमकी! अल्पवयीन मुलीला फोनवरून त्रास दिल्याच्या आरोपावरून एका तरुणाविरुद्ध जळगाव जामोद पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यासह भारतीय न्याय संहितेच्या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, संबंधित तरुण मुलीला वारंवार फोन करत होता. ‘तू मला खूप आवडतेस, माझे तुझ्यावर प्रेम आहे,’ असे सांगत त्याने तिला भेटायला बोलावले. ‘तू मला भेटायला ये, अन्यथा मी माझ्या जीवाचे काही बरेवाईट करीन,’ असेही त्याने फोनवर सांगितल्याचा आरोप आहे. सततच्या फोनमुळे त्रस्त झालेल्या मुलीने अखेर आईला घडलेला प्रकार सांगितला. मुलीकडून हा प्रकार समजल्यानंतर आईने जळगाव जामोद पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.
भारतीय न्याय संहितेचीही दोन कलमे
आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ७८ आणि ३५१(२) तसेच पॉक्सो कायद्याच्या कलम १२ अन्वये गुन्हा नोंदवला. पोलीस निरीक्षक सचिन बागुल यांच्या आदेशानुसार महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहा शेंडगे आणि महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपमाला वानखडे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.













Total Users : 3781077