सुनगाव, ता. जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा) “दुष्काळ सहन करण्याचा ठेका काय फक्त शेतकऱ्यांनीच घेतलाय?” असा सवाल करत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मायक्रोफायनान्स कंपन्या आणि बँकांच्या कर्जवसुलीवर घणाघात केला. दुष्काळ संघर्ष यात्रेच्या तिसऱ्या दिवशी, १६ नोव्हेंबरच्या रात्री सुनगावात झालेल्या जाहीर सभेला मोठी गर्दी होती.
बुलढाण्यात मायक्रोफायनान्स कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आपल्यावर अप्रत्यक्ष टीका झाल्याचे सांगत तुपकरांनी, “अंगावर आलात तर कार्यक्रमच लावून टाकीन!” असा इशारा दिला. मलकापुरात भेटलेल्या कर्मचाऱ्यांनी ‘आम्हीही शेतकऱ्यांची पोरं आहोत’ असं सांगितल्यावर, “मग स्वतःच्या बापाची किडनी काढून घेणार का?” असा सवाल केल्याचे त्यांनी सभेत सांगितले. दुष्काळ संपेपर्यंत व्याज आकारू नका आणि शेतकऱ्यांचा सिबिल स्कोअर बिघडू देऊ नका, अशी मागणी त्यांनी केली.
संचालकपदासाठी नेते एका ताटात, मग हक्कासाठी शेतकरी एकत्र का येऊ शकत नाहीत?
गेल्या पाच वर्षांत एकमेकांना विरोध करणारे पक्षही विचारधारेचे मतभेद बाजूला ठेवून आलटूनपालटून सत्तेत आले, असे तुपकर म्हणाले. बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा दाखला देत, एरवी एकमेकांशी भांडणारे नेते संचालक होण्यासाठी एका ताटात जेवतात, असा टोला त्यांनी लगावला. नेत्यांना एकमेकांच्या गळ्यात पडायला चालतं, मग शेतकऱ्यांना एकमेकांच्या सभेला जायला अडचण काय, असा सवाल करत त्यांनी दुष्काळाच्या प्रश्नावर पक्षभेद बाजूला ठेवण्याचं आवाहन केलं.
काही कोरडवाहू शेतकऱ्यांना एकरी एक ते दीड पोतं सोयाबीन झालं. एकरी ४० हजार रुपये खर्च करून हातात सात हजार आले, असा हिशेब मांडत तुपकरांनी क्षेत्रमर्यादेशिवाय हेक्टरी एक लाख रुपये मदतीची मागणी केली. ‘तिजोरीत पैसा नसेल तर आमदारांचे पगार तीन वर्षे बंद करा, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पगार निम्मे करा,’ असा टोलाही त्यांनी सरकारला लगावला.
१४ नोव्हेंबरला मलकापुरातून निघालेली यात्रा जिल्ह्यातील तेराही तालुक्यांत जाणार आहे. मागण्यांवर निर्णय झाला नाही तर राज्यव्यापी आंदोलन उभारण्याचा इशारा देत तुपकरांनी ४ डिसेंबरला बुलढाण्यात होणाऱ्या एल्गार महामोर्चात सहभागी होण्याचं आवाहन केलं.













Total Users : 3777395