धाड (हॅलो बुलढाणा) १७ नोव्हेंबर गाडीतून दोन लाखांची रोकड असलेली बॅग चोरीला गेली. धाडच्या गुन्ह्याचा तपास सैलानीपर्यंत पोहोचला आणि तिथे पोलिसांच्या हाती संपूर्ण रोकड लागली. या प्रकरणातील संशयित आंतरराज्य बॅग लिफ्टिंग टोळीतील असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
रायपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सैलानी येथून पोलिसांनी दोन लाखांची रोकड, ४५ हजारांची दुचाकी आणि ३० हजार ५०० रुपयांचे चार मोबाईल असा २ लाख ७५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याच दुचाकीच्या तपासातून जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद पोलीस ठाण्यात दाखल असलेला चोरीचा गुन्हाही उघडकीस आला.
या कारवाईत तमिळनाडूचा रामू वेंगा दुसन तोटीनायकर (३८), नंदुरबार जिल्ह्यातील कमासा मारमुत्तू तोटीनायकर (३६) आणि एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना पुढील कारवाईसाठी धाड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
LCB पोलीस निरीक्षक हेमंत ठाकरे यांच्या आदेशाने सहायक पोलीस निरीक्षक सुनील इंगळे यांच्यासह दीपक लेकुरवाळे, चांद शेख, अनुप मेहर, सतीश नाटेकर आणि निवृत्ती पुंड यांच्या पथकाने ही कारवाई केली.













Total Users : 3778814