spot_img
spot_img

पीककर्जासाठी शेतकऱ्यांच्या चकरा पुरे! आमदार सिद्धार्थ खरात थेट जानेफळच्या SBIत, वरिष्ठांनाही लावला फोन!

मेहकर (हॅलो बुलढाणा) नव्या पीककर्जासाठी बँकेत वारंवार चकरा माराव्या लागत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेत आमदार सिद्धार्थ खरात थेट जानेफळ येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत पोहोचले. शाखा व्यवस्थापक सचिन खेडेकर यांच्याशी चर्चा करत त्यांनी पीककर्ज वितरणातील अडचणींची माहिती घेतली. अनावश्यक कागदपत्रांची मागणी थांबवा, अर्ज विनाकारण प्रलंबित ठेवू नका आणि नियमानुसार पात्र शेतकऱ्यांना तातडीने पीककर्ज द्या, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.

लीड बँकेच्या सूचना असतानाही स्थानिक पातळीवर नव्या पीककर्जासाठी अडचणी येत असल्याच्या तक्रारी आमदार खरात यांच्याकडे आल्या होत्या. इतर बँकेचे कर्ज किंवा बोजा असल्याचे कारण देऊन पीककर्जाचे अर्ज सरसकट नाकारू नयेत, असा मुद्दा त्यांनी शाखा व्यवस्थापकांसमोर मांडला. प्रत्येक अर्जाची नियमानुसार स्वतंत्र तपासणी करावी आणि पात्र शेतकऱ्यांना वेळेत कर्ज उपलब्ध करून द्यावे, असे त्यांनी सांगितले.

शाखेत चर्चा, वरिष्ठांनाही थेट फोन

या भेटीदरम्यान खरात यांनी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशीही फोनवरून संवाद साधला. पीककर्ज घेताना शेतकऱ्यांना कोणत्या अडचणी येतात, हे त्यांनी वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिले. वितरणातील अडथळे दूर करण्यासाठी संबंधित यंत्रणेला आवश्यक सूचना द्याव्यात, अशी मागणीही त्यांनी केली. कर्जप्रक्रियेदरम्यान शेतकऱ्यांना योग्य सहकार्य मिळावे आणि त्यांना त्याच कामासाठी पुन्हा पुन्हा शाखेत यावे लागू नये, यावर त्यांनी भर दिला.

शेतीच्या हंगामात शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी बँकांनी सहकार्याची भूमिका घ्यावी, असे खरात म्हणाले. पात्र शेतकऱ्यांना वेळेत पीककर्ज मिळावे, यासाठी या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी माजी सरपंच संजय सुळकर, गजानन निकस यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!