spot_img
spot_img

जिजाऊंच्या जन्मभूमीत मुक्कामाची सोय कधी? आमदार मनोज कायंदेंच्या पाठपुराव्यानंतर मंत्रालयातून तातडीचे निर्देश!

देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा/संतोष जाधव) समृद्धी महामार्गावरून मातृतीर्थाची वाट दाखवणारे फलक, सिंदखेडराजात मुक्कामासाठी पर्यटक निवास आणि जिजाऊंच्या जन्मस्थळासह ऐतिहासिक स्मारकांचा विका या प्रस्तावांवर मुंबईतील मंत्रालयात झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला प्रस्तावित कामांवर तातडीने कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश दिले. या आराखड्यासाठी आमदार मनोज कायंदे यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून ते बैठकीला उपस्थित होते.

मातृतीर्थात येणाऱ्या पर्यटकांना आवश्यक माहिती मिळावी, यासाठी अभ्यागत सुविधा केंद्र विकसित करण्याचा प्रस्ताव आहे. महामंडळामार्फत नवीन पर्यटक निवास उभारण्यासह आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यावरही बैठकीत चर्चा झाली. समृद्धी महामार्गावर दिशादर्शक आणि माहितीफलक उभारण्याचा मुद्दाही आराखड्यात आहे.

राज्यमंत्र्यांनी महामंडळाच्या अधिकाऱ्यांसमवेत लवकरच सिंदखेडराजाला भेट देऊन प्रत्यक्ष स्थळपाहणी करण्याचे निर्देश दिले. पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय जाधव, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश गटणे आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या जन्मभूमीचा ऐतिहासिक वारसा जपत सिंदखेडराजाला राज्याच्या पर्यटन नकाशावर महत्त्वाचे स्थान मिळवून देण्यासाठी हा आराखडा महत्त्वाचा ठरेल, असे आमदार कायंदे यांनी सांगितले.

आता नजर स्थळपाहणीवर!

मंत्रालयातून तातडीचे निर्देश निघाले. प्रत्यक्ष पाहणी कधी होणार, कोणत्या कामाला आधी हात लागणार आणि पर्यटकांना या सुविधा कधी मिळणार, याची उत्तरे पुढील कार्यवाहीतून मिळतील.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!