मोताळा (हॅलो बुलढाणा) तालुक्यातील वारूळी परिसरातील वनजमिनीवर कथित अवैध उत्खननाचा गंभीर प्रकार समोर आला असून, या प्रकरणाने आता वेगळेच वळण घेतले आहे. वनजमिनीतून तब्बल 130.767 ब्रास माती व मुरूमाचे उत्खनन करून वाहतूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात वनगुन्हा दाखल होऊनही उत्खननासाठी वापरण्यात आलेली जेसीबी आणि ट्रॅक्टर-ट्रॉली अद्याप जप्त का करण्यात आली नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.
भूमी हक्क परिषद, महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष के. जी. शाह यांनी यासंदर्भात 17 नोव्हेंबर रोजी उपवनसंरक्षक, बुलढाणा यांच्याकडे सविस्तर तक्रार दाखल केली आहे. वारूळी येथील वनबीट राजूर परिसरातील वनजमिनीतून माती व मुरूमाचे उत्खनन करून ते ट्रॅक्टर- ट्रॉलीच्या साहाय्याने संबंधित व्यक्तीच्या शेतातील नाला बुजविण्यासाठी वापरण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणात वनरक्षक एल. डी. राठोड यांनी 9 जुलै 2026 रोजी मिठाराम सोनाजी बिचकुले यांच्याविरुद्ध वनगुन्हा दाखल केला होता. वनगुन्ह्याच्या पहिल्या प्रतिवृत्तात 12,376.70 घनफूट म्हणजेच 130.767 ब्रास माती व मुरूमाचे उत्खनन झाल्याची नोंद असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे.
▪️वनविभागाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह!
एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्खनन झाल्याचा आरोप असतानाही जेसीबी आणि ट्रॅक्टर-ट्रॉली जप्त करण्यात आलेली नसल्याने वनविभागाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. संबंधित यंत्रांचे मालक आणि चालक यांना सहआरोपी का करण्यात आले नाही, असाही सवाल संघटनेने उपस्थित केला आहे.
▪️अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी!
या प्रकरणात संबंधित वनाधिकारी व कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप भूमी हक्क परिषदेने केला आहे. सहायक वनसंरक्षकांनी 23 जुलै 2026 रोजी केलेल्या स्थळ पाहणी अहवालाचाही तक्रारीत उल्लेख आहे. या अहवालातील निरीक्षणे आणि प्रत्यक्ष झालेल्या कारवाईची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
▪️सात दिवसांत कारवाई करा, अन्यथा नागपूरमध्ये आंदोलन!
भूमी हक्क परिषदेने वनविभागासमोर आता सात दिवसांची मुदत ठेवली आहे. संबंधित जेसीबी, ट्रॅक्टर-ट्रॉलीसह उत्खननासाठी वापरण्यात आलेली यंत्रसामग्री तातडीने जप्त करून शासनजमा करावी, यंत्रांचे मालक व चालक यांच्याविरुद्ध स्वतंत्र वनगुन्हा दाखल करावा आणि दोषी अधिकारी-कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
मागण्यांची पूर्तता न झाल्यास नागपूर येथील वनभवन कार्यालयासमोर हजारोंच्या संख्येने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष के. जी. शाह यांनी दिला आहे.













Total Users : 3778965