खामगाव (हॅलो बुलढाणा) दिवाळीच्या रात्री फटाके फुटत होते. तेवढ्यात घराचा पडदा पेटला आणि आत धूर पसरला. ‘आमच्या घराकडे फटाका का फेकला?’ असा जाब विचारण्यासाठी किराणा दुकानदार संदीप हरमकर बाहेर आले. त्यावेळी एकाने त्यांना मागून पकडले, तर दुसऱ्याने त्यांच्या डाव्या मांडीवर चाकूने वार केला, असा आरोप त्यांच्या पत्नी नम्रता हरमकर यांनी फिर्यादीत केला आहे. खामगाव तालुक्यातील जनुना येथे ८ नोव्हेंबरला रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली.
फिर्यादीनुसार, हनुमान मंदिराजवळील साई किराणा दुकानासमोर सार्थक आणि नंदन भुसारी हे दोघे भाऊ फटाके फोडत होते. सार्थकने पेटवलेला सुतळी बॉम्ब घराच्या पडद्यावर फेकल्याने पडद्याने पेट घेतला. घरात धूर पसरताच नम्रता बाहेर आल्या. संदीप यांनी जाब विचारल्यावर सार्थकने चाकूने वार करण्याची धमकी दिली. त्यानंतर नंदनने संदीप यांना मागून धरले आणि सार्थकने वार केला. संदीप रक्तबंबाळ झाले, तर दोघे भाऊ तिथून पळून गेले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
नम्रता यांच्या आरडाओरडीनंतर शेजारी धावून आले. त्यांनी जखमी संदीप यांना ऑटोने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नेले. तिथून त्यांना उपचारासाठी खामगावच्या सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले.
नम्रता यांची तोंडी फिर्याद आणि वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे शिवाजीनगर पोलिसांनी ९ नोव्हेंबरला मध्यरात्रीनंतर १२ वाजून १७ मिनिटांनी सार्थक व नंदन भुसारी यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला. पोलीस हेड कॉन्स्टेबल सूरज राठोड पुढील तपास करत आहेत.












Total Users : 3732138