बुलढाणा (हॅलो बुलढाणा) लक्ष्मीपूजनाची रात्र. पहाटे दोनच्या सुमारास वृंदावन नगरात गजानन वाघ यांच्या घराजवळ चौघे दबक्या पावलांनी आले. घराला छिद्र पाडून आत शिरण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आवाज कानावर पडताच वाघ सावध झाले. घरात हालचाल झाल्याचे लक्षात येताच चौघांनी तिथून पळ काढला. पण त्यानंतर त्यांनी थेट माळविहीर गाठले!
माळविहीरमध्ये शेतकरी शंकर उत्तम आडवे यांच्या घराला या चौघांनी लक्ष्य केले. तिथेही घरफोडीचा प्रयत्न फसला आणि त्यांना रिकाम्या हाताने पळावे लागले. मात्र, आडवे यांच्या घरावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चौघे कैद झाले. चेहरे पूर्णपणे कापडाने झाकलेले आणि अंगावर फक्त चड्डी, अशा वेशात हे संशयित कॅमेऱ्यात दिसले. एकाच रात्री दोन ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न झाल्याची बातमी पसरताच अख्खं माळविहीर गाव जागं झालं.
घटनेची माहिती मिळताच बुलढाणा पोलिसांनी रात्रीच घटनास्थळी धाव घेतली. शशिकांत धारकरी, हेडकॉन्स्टेबल नागरे, रंजीत हिवाळे, गजू निकम आणि सुभाष धनवे घटनास्थळी दाखल झाले. सीसीटीव्हीत दिसणाऱ्या चौघांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू आहे.
‘हॅलो बुलढाणा’चा सावधानतेचा इशारा
दिवाळीच्या रात्री घराभोवती संशयास्पद हालचाल दिसली किंवा आवाज ऐकू आला, तर तात्काळ पोलिसांना कळवा.












Total Users : 3732136