डोणगाव (हॅलो बुलढाणा/अनिल राठोड) पद मिळालं, प्रतिष्ठा मिळाली, स्वतःचा उद्योगही उभा राहिला; मात्र या यशाचा पाया घालणाऱ्या गुरुंची आठवण अभियंता वैभव अविनाश लाटे यांनी कायम जपली. प्रा. अभियंता परीक्षित अनिल आवटी यांच्या संपूर्ण कुटुंबाची भेट घेऊन सन्मान करत त्यांनी कृतज्ञता कृतीतून व्यक्त केली.
सन २०१५ ते २०१७ या काळात आवटी सरांचे मार्गदर्शन लाभलेल्या वैभव यांनी विद्युत अभियांत्रिकी क्षेत्रात उल्लेखनीय वाटचाल केली. महावितरणमधील कामाच्या अनुभवापासून विद्युत प्रकल्पांतील योगदानापर्यंत मजल मारल्यानंतर त्यांनी हिंगोली येथे ‘अन्वी टेक्नॉलॉजी’ची स्थापना केली. मात्र, यशाच्या धावपळीत आपल्या जडणघडणीतील गुरुंचा वाटा विसरला नाही.
वैभव यांचे वडील अविनाश लाटे यांनीही गौरवपत्रातून आवटी सरांच्या योगदानाला शब्दरूप दिले. विद्यार्थ्याला केवळ अभ्यास शिकवण्यापलीकडे आत्मविश्वास, दिशा आणि मोठी स्वप्ने पाहण्याची जिद्द देणाऱ्या शिक्षकाचे स्थान अनमोल असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
या भेटीचे वैशिष्ट्य म्हणजे शिक्षकासोबत त्यांच्या कुटुंबालाही दिलेला मान. गुरु-शिष्य नात्यातील आदर आणि आपुलकी जपत वैभव यांनी नव्या पिढीसमोर प्रेरणादायी उदाहरण ठेवले.
शिक्षकांच्या मार्गदर्शनातून मिळालेल्या बळाची जाणीव ठेवणारा विद्यार्थी आणि त्या योगदानाची दखल घेणारा पिता, या दोघांच्या कृतीतून कृतज्ञतेची परंपरा पुढे आली. गुरुंचा सन्मान शब्दांपुरता मर्यादित न ठेवता कुटुंबापर्यंत पोहोचविण्यातच या भेटीचे वेगळेपण ठळकपणे दिसले





Total Users : 3713433