spot_img
spot_img

देऊळघाटच्या विकासासाठी श्वेता महालेंचा एल्गार; काँग्रेसच्या कारभारावर प्रहार! ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकवा, विकासाला निधी कमी पडू देणार नाही; पाणी, शाळा अन् रस्त्यांसाठी मोठी आश्वासने!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बुलढाणा मतदारसंघातील देऊळघाटच्या विकासासाठी जात, धर्म आणि पक्षभेद बाजूला ठेवून एकत्र या; ग्रामपंचायतीत भाजपचे नेतृत्व आणल्यास विकासकामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही आमदार श्वेता महाले यांनी दिली. देऊळघाट येथील विकास परिवर्तन सभेत त्यांनी मूलभूत सुविधांचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेसच्या कारभारावर निशाणा साधला.

अनेक वर्षे काँग्रेसची सत्ता असतानाही गावातील रस्ते, नाल्या आणि जिल्हा परिषद शाळांच्या समस्या कायम राहिल्याचा आरोप महाले यांनी केला. मुस्लिम समाजाचा केवळ मतांसाठी विचार करण्याऐवजी शिक्षण, रोजगार आणि विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. गावाची ओळख बदलण्यासाठी नागरिकांनी संघटितपणे पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

पाणी, शाळा अन् रस्त्यांसाठी आश्वासनांचा अजेंडा!

पद्मावतीची पाइपलाइन देऊळघाटपर्यंत आणण्यासाठी प्रयत्न करणार, पीएम श्री योजनेतून जिल्हा परिषद शाळेसाठी ४० लाख रुपयांचा निधी आणणार आणि २५१५ योजनेतून अंतर्गत रस्ते व नाल्यांची कामे करणार, अशी आश्वासने महाले यांनी दिली. प्रत्येक समाजासाठी सभामंडप आणि गोरगरीब विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.

धाड येथे आपल्या आमदारकीच्या काळात फडणवीस सरकारच्या माध्यमातून ५० लाख रुपयांचा शादीखाना मंजूर करून दिल्याचे महाले यांनी सांगितले. कब्रस्तानाचे सुशोभीकरण आणि अन्य ठिकाणी शादीखान्यांसाठी काम केल्याचाही त्यांनी उल्लेख केला.

सभेतील अपेक्षा मतदानातून व्यक्त करा!

केवळ सभा, भाषणे आणि घोषणांनी विकास साधणार नाही; नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचे महाले म्हणाल्या. सभेत व्यक्त होणारा रोष आणि विकासाची अपेक्षा मतदानातून पुढे यावी, असे आवाहन त्यांनी केले. शासकीय योजनांचा लाभ देताना धर्माच्या आधारावर भेदभाव होत नसल्याचेही त्यांनी सांगितले.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर हारतुरे व सत्काराचा खर्च टाळून मुख्यमंत्री साहाय्यता कक्षाला मदत देण्याच्या गावकऱ्यांच्या निर्णयाचे त्यांनी कौतुक केले.

यावेळी इद्रिस मुलतानी भाजप अल्पसंख्याक आघाडी, भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे, सलीम भाई घाणीवाले प्रदेश सचिव अल्पसंख्याक आघाडी, भाजप जिला महामंत्री दत्ता पाटील, चंद्रकांत बरदे जिल्हा उपाध्यक्ष भाजप, मंदार बाहेकर शहराध्यक्ष भाजप, सतीश पाटील तालुका अध्यक्ष भाजप, सलीम भाई परवेज सचिव अल्पसंख्याक आघाडी, मुन्नाजी बेंडवाल, नारायण हेलगे जिल्हा सचिव भाजप, मुकुंद देशपांडे जिल्हा सचिव, कौस्तुभ पाटील, राजेश पाठक, नंदूभाऊ लवंगे, आकाश दळवी नगरसेवक, महंमद अकिल भाई, हरीनारायण गायकवाड शिक्षक आघाडी सचिव, नीलकुमार बंगाळे, आयोजक रिझवान खान, समीर खान व गावकरी मंडळी उपस्थित होते.आणि ग्रामस्थांची उपस्थिती होती.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!