मेहकर (हॅलो बुलढाणा) कॅमेऱ्यांवर काळा स्प्रे मारून एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला; मात्र गॅस कटरच्या वापरामुळे आग लागून मशीनच्या व्हॉल्टचे नुकसान झाले! मेहकरच्या बसस्थानक रोडवरील एसबीआयच्या एटीएममध्ये ३० ऑक्टोबर रोजी पहाटे दोनच्या सुमारास हा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी मेहकर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हिताची पेमेंट सर्व्हिसेसचे चॅनल एक्झिक्युटिव्ह भीमराव आंबादास बलखंडे यांनी याबाबत तक्रार दिली. कंपनीच्या मुंबईतील सर्व्हेलन्स टीमला पहाटे २.१२ वाजण्याच्या सुमारास एटीएमच्या ठिकाणी आग दिसली. त्यानंतर टीमने बलखंडे आणि स्थानिक पोलिसांना माहिती दिली.
सकाळी अकराच्या सुमारास बलखंडे यांनी घटनास्थळी भेट दिली असता कॅमेऱ्यांवर काळ्या रंगाचा स्प्रे मारल्याचे आढळले. एटीएमचा समोरील भाग गॅस कटरने कापण्याचा प्रयत्न झाल्याचेही दिसले. चोरीच्या प्रयत्नादरम्यान लागलेल्या आगीत व्हॉल्ट जळून नुकसान झाल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. रोख रक्कम चोरीला गेल्याचा किंवा नुकसानीच्या रकमेचा तक्रारीत उल्लेख नाही.
बलखंडे यांच्या तक्रारीवरून ३० ऑक्टोबर रोजी दुपारी ४.०९ वाजता भारतीय न्याय संहितेच्या कलम ३२४(२) व ६२ अन्वये गुन्हा क्रमांक ०७२४/२०२६ नोंदविण्यात आला आहे. कॅमेऱ्यांची नजर चुकवून एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणारा अज्ञात आरोपी कोण, हा प्रश्न आता समोर आला आहे.





Total Users : 3695372