बुलढाणा (हॅलो बुलढाणा) पाण्यात वेग, नजरेसमोर लक्ष्य अन् विजयाची जिद्द! बुलढाण्याच्या सहा जलतरणपटूंनी विभागीय जलतरण स्पर्धेत दमदार कामगिरी करत दोन सुवर्णांसह आठ पदके पटकावली. या यशासह सर्व सहाही खेळाडूंनी राज्यस्तरीय स्पर्धेचे तिकीट मिळवले असून, आता पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलात बुलढाण्याचा झेंडा फडकवण्यासाठी ते सज्ज झाले आहेत.
३० ऑक्टोबर रोजी अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या जलतरण तलावात ही स्पर्धा झाली. हर्ष विष्णूभगवान गाढेने १५०० मीटर फ्रीस्टाइलमध्ये सुवर्णपदक, तर १०० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये रौप्यपदक पटकावत दुहेरी यश मिळवले. दीपक वराडेने ५० मीटर फ्रीस्टाइलमध्ये सुवर्णपदकावर नाव कोरले.
अक्षदा बेंडाळेने ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये, समर्थ आंबेकरने १५०० मीटर फ्रीस्टाइलमध्ये आणि करण वराडेने २०० मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये रौप्यपदक मिळवले. भाग्यश्री जाधवने ५० मीटर बटरफ्लायमध्ये रौप्यपदक आणि २०० मीटर फ्रीस्टाइलमध्ये द्वितीय क्रमांक पटकावत दुहेरी यशाची नोंद केली.
खेळाडूंच्या या कामगिरीमागे प्रा. मनोज व्यवहारे, अमरावतीचे प्रा. मंगेश व्यवहारे, विशाल खंडारे यांचे मार्गदर्शन आणि प्रशिक्षक संदीप जाधव यांच्या सातत्यपूर्ण प्रशिक्षणाचा मोलाचा वाटा आहे.
मेहनत, चिकाटी आणि सरावाच्या जोरावर या खेळाडूंनी विभागीय स्पर्धेत बुलढाण्याची ताकद दाखवून दिली. दोन सुवर्ण आणि सहा रौप्यपदकांची कमाई जिल्ह्याच्या क्रीडाक्षेत्रासाठी अभिमानाची ठरली आहे. आता राज्यस्तरीय स्पर्धेतही अशीच चमकदार कामगिरी करण्यासाठी या जलतरणपटूंसमोर नवे लक्ष्य आहे.





Total Users : 3693724