बुलढाणा (हॅलो बुलढाणा) आधी वनसीमेजवळ मुरुमाचे उत्खनन, त्यानंतर जमीन मालकीवरून वाद, माजी मंत्र्यांना फोन आणि पुढे वनरक्षकावरच आर्थिक अनियमिततेचे आरोप! अंचरवाडी बीटमधील या घटनाक्रमाबाबत वनरक्षक गजानन माणिकराव पोटे यांनी कर्मचारी संघटनेकडे निवेदन देत आपली बाजू मांडली आहे. बेकायदेशीर उत्खननाला विरोध केल्यामुळे बदनामी आणि मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचा त्यांचा आरोप आहे.
पोटे यांच्या निवेदनानुसार, ९ जुलै २०२६ रोजी कक्ष क्रमांक ५४३ परिसरात गस्तीदरम्यान मुरुमाचे उत्खनन निदर्शनास आले. सागर गजानन परिहार यांनी जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या साहाय्याने उत्खनन व वाहतूक केल्याचा दावा त्यांनी केला आहे. संबंधितांनी जमीन स्वतःची असल्याचे सांगितले; मात्र केएमएल नकाशानुसार जागा वनहद्दीत दिसत असल्याचे पोटे यांचे म्हणणे आहे.
वनपाल प्रदीप मुंडे यांनीही घटनास्थळी पाहणी केल्याचे निवेदनात नमूद आहे. यावेळी संबंधित व्यक्तीने माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांना फोन केल्याचा आणि फोनवर जमीन परिहार यांची असल्याचे सांगण्यात आल्याचा दावा पोटे यांनी केला आहे. अंतिम मोजणी होईपर्यंत उत्खनन व वाहतूक थांबविण्याच्या सूचना दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मोजणीचे पत्र गेले; मग सीमा निश्चित का झाली नाही?
१० जुलै रोजी वन सर्वेक्षक कार्यालयाशी पत्रव्यवहार करूनही तीन महिने मोजणी झाली नसल्याचे पोटे यांनी म्हटले आहे. या विलंबाचा फायदा घेऊन काही पशुपालकांना सोबत घेत आपल्याविरुद्ध खोट्या आर्थिक तक्रारी करण्यात आल्याचा त्यांचा आरोप आहे.
बातम्यांमुळे सामाजिक बदनामी झाल्याचे सांगत पोटे यांनी संभाव्य राजकीय दबावातून होणाऱ्या एकतर्फी प्रशासकीय कारवाईपासून संरक्षण आणि आवश्यकतेनुसार कायदेशीर मदत मागितली आहे. आता वनसीमा मोजणी कधी होणार आणि परस्परविरोधी दाव्यांची निष्पक्ष चौकशी होणार का, हे प्रश्न पुढे आले आहेत. उपलब्ध निवेदनात संबंधित व्यक्ती, माजी मंत्री आणि वनविभागाची बाजू समाविष्ट नाही.





Total Users : 3694431