अमरावती (हॅलो बुलढाणा | निवडणूक अपडेट) अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीत पहिल्याच फेरीत चुरस वाढवणारी प्राथमिक माहिती समोर येत आहे. मिळालेल्या अनधिकृत माहितीनुसार, महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक अंदाजे १,५०० मतांनी आघाडीवर असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या आघाडीच्या आकड्याला अधिकृत पुष्टी मिळणे बाकी आहे.
पहिल्या फेरीतील सुमारे १४ हजार मतपत्रिकांची मोजणी पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. प्राथमिक कलानुसार, सरनाईक यांच्या पाठोपाठ शिवसेना शिंदे गटाचे बंडखोर उमेदवार श्रीकांत देशपांडे दुसऱ्या स्थानावर असल्याचे समजते.
देवकर आणि लहाने यांच्या तिसऱ्या स्थानाबाबत वेगवेगळी माहिती येत असल्याने त्यांची निश्चित क्रमवारी अद्याप स्पष्ट झालेली नाही. पोहरे पाचव्या स्थानावर असण्याचाही प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.
दरम्यान, किरण सरनाईक लोकशाही भवन येथील मतमोजणी केंद्रावर दाखल झाल्याची माहिती मिळाली आहे. सुरुवातीची आघाडी टिकवून सरनाईक अंतर वाढवणार की देशपांडे पुढील मोजणीत आव्हान उभे करणार, याकडे आता लक्ष लागले आहे.पहिल्या फेरीचा कल उत्सुकता वाढवणारा असला, तरी विजयाची घोषणा झालेली नाही. पुढील मोजणीतील आकडे आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची अधिकृत घोषणा यानंतरच चित्र स्पष्ट होईल.





Total Users : 3668571