छत्रपती संभाजीनगर (हॅलो बुलढाणा) मैदानात देशभरातील देखण्या अश्वांची चुरस… प्रत्येकाचा रुबाब अन् थाट लक्षवेधी! अशा तगड्या स्पर्धेत बुलढाण्याच्या ‘रघुवीर’ने आपल्या दमदार उपस्थितीची छाप सोडत चौथ्या क्रमांकावर मोहोर उमटवली. छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या अश्व स्टॅलियन कॅटेगरी स्पर्धेत रॉयल कारभार फार्मच्या या अश्वाने मिळवलेले यश जिल्ह्यासाठी अभिमानाचा विषय ठरले आहे.
देशभरातून सहभागी झालेल्या २५ उत्कृष्ट अश्वांमध्ये स्थान मिळवणे आणि त्यातून चौथा क्रमांक पटकावणे, ही कामगिरी बुलढाण्याच्या अश्वपालनाची ताकद अधोरेखित करणारी ठरली. भव्य व्यक्तिमत्त्व, मजबूत शरीरयष्टी, देखणेपणा आणि उत्कृष्ट सादरीकरणाच्या जोरावर ‘रघुवीर’ने परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले.
या यशामागे रॉयल कारभार फार्मचे मालक विनायक भाग्यवंत यांची मेहनत आणि अश्व संगोपनातील सातत्य आहे. दर्जेदार अश्व घडवण्याची आवड, निगा आणि संगोपनासाठी घेतलेल्या परिश्रमांना या निकालाने यशाची पावती दिली आहे.
‘रघुवीर’च्या कामगिरीमुळे बुलढाण्याचे नाव स्पर्धेच्या व्यासपीठावर झळकले असून, अश्वप्रेमींमधून भाग्यवंत आणि रॉयल कारभार फार्मवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या यशाने स्थानिक अश्वपालकांचा उत्साह वाढवला असून, बुलढाण्यातील दर्जेदार अश्व संगोपनाकडे लक्ष वेधले आहे.
तगड्या प्रतिस्पर्ध्यांमध्ये मिळवलेल्या चौथ्या स्थानाने ‘रघुवीर’ची गुणवत्ता ठसवली. राजेशाही रुबाबाला मेहनतीची जोड मिळाल्यावर यशाचा टाप कसा उमटतो, याची झलक या कामगिरीतून दिसली. बुलढाण्याच्या अश्वप्रेमींसाठी ‘रघुवीर’चे हे यश कौतुकाचा आणि अभिमानाचा क्षण ठरले आहे.





Total Users : 3667721