इसरूळ, दि. २६ ऑक्टोबर (हॅलो बुलढाणा) धरणासाठी जमिनी आमच्या गेल्या… घरे आमची बुडाली… आता उभी पिके जगवण्यासाठीही संघर्ष करायचा? खडकपूर्णा प्रकल्प परिसरातील शेतकऱ्यांनी या संतप्त सवालासह प्रशासनाच्या कारवाईला जोरदार विरोध केला. शेतातील पाणी उपसणाऱ्या मोटारी बंद करण्यासाठी आलेल्या पथकाला शेतकऱ्यांच्या एकजुटीमुळे कारवाईविनाच परतावे लागल्याची माहिती समोर आली आहे.
सोमवारी सकाळी प्रकल्पाचे शाखा अभियंता राजगुरू यांच्यासह पोलीस, महसूल आणि महावितरणचे कर्मचारी परिसरात दाखल झाले. याची माहिती मिळताच शेतकरी एकत्र आले. घोषणाबाजी करत त्यांनी अधिकाऱ्यांसमोर प्रश्नांची सरबत्ती केली. उभ्या पिकांना पाण्याची गरज असताना मोटारी बंद करण्याचा निर्णय कोणत्या आधारावर घेतला जात आहे, अशी विचारणा करण्यात आली.
मोटारी अनधिकृत म्हणता, बोटींचे उत्तर द्या!
आमच्या मोटारी अनधिकृत असतील, तर धरणात वाळूउपसा करणाऱ्या बोटी अधिकृत आहेत का? शेतकऱ्यांवर कारवाईसाठी दाखवली जाणारी तत्परता बोटींबाबत का दिसत नाही, असा सवाल उपस्थित करत शेतकऱ्यांनी कथित दुजाभावाचा आरोप केला. बोटींच्या अधिकृततेबाबत स्पष्ट माहिती जाहीर करण्याची मागणीही करण्यात आली.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून पीक हाती येईपर्यंत पाणीपुरवठा सुरू ठेवण्याची मागणी करण्यात आली. ऊस उत्पादकांचे लाखो रुपयांचे नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाने साखर कारखान्यांशी तातडीने संपर्क साधून ऊसतोड टोळ्या पाठवाव्यात आणि ऊस उचलण्याची व्यवस्था करावी, असेही शेतकऱ्यांनी म्हटले आहे.
आधीच संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यास जबाबदारी कोण घेणार, अशी विचारणा यावेळी झाली. प्रकल्पग्रस्तांच्या पाणीवापराबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करूनच पुढील निर्णय घ्यावा, अशी मागणी उपस्थितांनी केली.
आंदोलनात युवासेना उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर, मंडपगावचे सरपंच सचिन कदम, चिंचखेडचे सरपंच रामेश्वर वायाळ, माजी सरपंच मार्तंड वायाळ, सुरेशराव वायाळ, रविराज देशमुख, विष्णू भुतेकर, वाल्मिक देशमुख यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले





Total Users : 3665393