spot_img
spot_img

तिकडे नातेवाईकाला अखेरचा निरोप… इकडे घरात चिमुकल्याचा जीव गेला!खेळता खेळता आठ वर्षीय आदित्यचा दुर्दैवी मृत्यू; सुनगाव सुन्न, मिरटकार कुटुंबावर दुःखाचा डोंगर!

जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा/ज्ञानदेव राजनकर) नातेवाईकाच्या अपघाती मृत्यूचे दुःख सावरण्याआधीच मिरटकार कुटुंबावर आणखी एक आघात झाला. अंत्यविधीसाठी कुटुंबीय शेगावला गेले असताना सुनगाव येथील घरात खेळणाऱ्या आठ वर्षीय आदित्य रमेश मिरटकार याचा गळ्याभोवती दोरी अडकल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. २४ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेने गाव सुन्न झाले आहे.

 

आदित्य सुनगावच्या जिल्हा परिषद शाळेत इयत्ता दुसरीमध्ये शिकत होता. शेगाव येथे नातेवाईकाचा मोटारसायकल अपघातात मृत्यू झाल्याने त्याचे आई-वडील, आजी-आजोबा आणि इतर नातेवाईक अंत्यविधीसाठी गेले होते. दरम्यान, त्याची आत्या मोठ्या भावाला पाहण्यासाठी बाजारात गेल्याची माहिती आहे. याच काळात घरात खेळताना आदित्यसोबत हा अनर्थ घडला.

घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांना जबर धक्का बसला. एका नातेवाईकाला अखेरचा निरोप देण्यासाठी गेलेल्या कुटुंबाला स्वतःच्या चिमुकल्याच्या मृत्यूची बातमी ऐकावी लागली. आई-वडील आणि आजी-आजोबांचा आक्रोश उपस्थितांची मने हेलावून गेला. आत्याच्या मांडीवरील आदित्यचे पार्थिव पाहून नागरिकांनाही अश्रू अनावर झाले.

माहिती मिळताच जळगाव जामोद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन बागुल, उपनिरीक्षक गणेश कायंदे, नागेश खाडे आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पाहणी करून पंचनामा केला. जय भवानी रुग्णवाहिकेचे चालक राजू बुटे यांच्या मदतीने पार्थिव जळगाव जामोद ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले.

रात्री शोकाकुल वातावरणात आदित्यवर अंत्यसंस्कार करण्यात आले. अवघ्या आठ वर्षांच्या मुलाला अखेरचा निरोप देताना कुटुंबीयांसह ग्रामस्थांचेही डोळे पाणावले. या प्रकरणी पोलिसांनी मर्ग दाखल केला असून, पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रविकांत बावस्कर करीत आहेत.

या घटनेने लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही पुन्हा अधोरेखित झाला आहे. घरातील दोऱ्या आणि इतर धोकादायक वस्तू मुलांच्या आवाक्याबाहेर ठेवणे, त्यांच्या खेळाकडे लक्ष देणे आणि सुरक्षित वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. क्षणभरात घडणारी दुर्घटना संपूर्ण कुटुंबाच्या आयुष्याला कायमची जखम देऊन जाते.
दप्तर घेऊन शाळेत जाण्याच्या वयात आदित्यचा प्रवास कायमचा थांबला. त्याच्या अकाली जाण्याने मिरटकार कुटुंबाच्या घरातील हसू हरपले असून, सुनगावातून हळहळ व्यक्त होत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!