लोणार (हॅलो बुलढाणा/राहुल सरदार) छातीत असह्य वेदना… स्वतःच्या जिवावर बेतलेला प्रसंग… तरीही हातातील स्टेअरिंग सांभाळत त्यांनी प्रवाशांना सुखरूप पोहोचवले! मेहकर आगाराचे चालक तेजराव संपतराव तेजनकर यांच्या कर्तव्यनिष्ठेला सलाम होत असतानाच, त्यांच्या उपचारादरम्यान कामावर येण्याची सक्ती केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. प्रवाशांचा जीव जपणाऱ्या चालकाच्या जिवाची काळजी कोण घेणार? असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे.
२० ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या दिवशी तेजनकर वझर आघाव-लोणार फेरीवर कर्तव्य बजावत होते. सायंकाळी साडेचार ते पाचच्या सुमारास त्यांच्या छातीत अचानक तीव्र वेदना सुरू झाल्या. प्रकृती बिघडत असतानाही त्यांनी प्रसंगावधान राखून बस लोणार बसस्थानकात सुरक्षित आणली. प्रवासी आणि कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत त्यांना उपचारासाठी मदत केली.
मेहकर येथील डॉक्टरांनी तपासणीनंतर तीव्र हृदयविकाराचे निदान केल्याचे सांगण्यात आले. पुढील उपचारांसाठी त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या धूत रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारानंतर प्रकृती सुधारली असली, तरी डॉक्टरांनी विश्रांती आणि मानसिक ताण टाळण्याचा सल्ला दिल्याची माहिती आहे.
मात्र, उपचार सुरू असल्याची पूर्वकल्पना देऊनही अधिकाऱ्यांनी ड्युटी लावल्याचा आरोप सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघटनेने केला आहे. संघटनेच्या म्हणण्यानुसार, २१ ऑक्टोबरच्या कामगिरी तक्त्यावर २२ ऑक्टोबरची कामगिरी नोंदवून तेजनकर यांना हजर राहण्याची सक्ती करण्यात आली.
संघटनेचे विभागीय तथा प्रादेशिक कार्याध्यक्ष सत्यनारायण परमेश्वर तेजनकर यांनी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. संबंधितांना प्रकृतीची माहिती दिल्यानंतरही झालेल्या कथित सक्तीमुळे चालकासह कुटुंबाला मानसिक त्रास झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. वरिष्ठांकडे लेखी तक्रार करून निष्पक्ष चौकशी आणि दोषींवर कारवाईची मागणी करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले





Total Users : 3660267