मलकापूर (हॅलो बुलढाणा / करण झनके) शहरात व्यापारी राकेश मोहनदास तलेरेजा यांच्यावर झालेल्या भीषण अॅसिड हल्ल्याने व्यापारी वर्गात संतापाची लाट उसळली आहे. या धक्कादायक घटनेचे वृत्त ‘हॅलो बुलढाणा’ने जिल्ह्यात सर्वप्रथम लाखो वाचकांपर्यंत पोहोचवले! आता या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले असून, चेंबर ऑफ कॉमर्स आणि व्यापारी संघटना थेट पोलिसांकडे धाव घेत आरोपींना तातडीने बेड्या ठोकण्याची मागणी करीत आहेत.
नाव विचारले… अन् क्षणात दोनदा अॅसिड फेकले!
२१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ ते ६:३० वाजण्याच्या सुमारास सुनील टॉकीज रोडवर दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी राकेश तलेरेजा यांना नाव विचारले. त्यानंतर अचानक दोन वेळा अॅसिड फेकल्याचे व्यापारी संघटनेच्या निवेदनात नमूद आहे. या हल्ल्यात तलेरेजा यांच्या दोन्ही डोळ्यांना आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे.
व्यापारी संघटनांचा संताप; पोलिसांना थेट सवाल!
भरवस्तीत व्यापाऱ्यावर असा हल्ला होत असेल, तर सर्वसामान्य व्यापाऱ्यांच्या सुरक्षेचे काय? असा सवाल आता उपस्थित होत आहे.चेंबर ऑफ कॉमर्स आणि व्यापारी संघटनेने उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देत तपासाला गती देण्याची आणि आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.निवेदनानुसार, पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
हल्ल्यामागचा सूत्रधार कोण? कारण काय?
हल्लेखोरांनी नाव विचारूनच अॅसिड फेकल्याचा दावा करण्यात आल्याने या हल्ल्यामागील नेमके कारण काय, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. मात्र, हल्ल्याचा उद्देश अद्याप स्पष्ट झालेला नाही.
आता व्यापारी वर्गाचे लक्ष पोलिसांच्या तपासाकडे लागले आहे. आरोपी कधी पकडले जाणार आणि हल्ल्यामागील सत्य कधी उघड होणार, याकडे संपूर्ण मलकापूरचे लक्ष आहे!





Total Users : 3648696