बुलढाणा (हॅलो बुलढाणा) अमरावती शिक्षक मतदारसंघात मतदानाच्या तोंडावर नवा वाद पेटण्याची चिन्हे आहेत! प्रचाराची मुदत संपल्यानंतरही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार तथा विद्यमान आमदार किरण सरनाईक यांचे प्रचाराचे बॅनर बुलढाणा शहरातील प्रमुख चौकांत झळकत असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे आदर्श आचारसंहितेच्या पालनाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
२३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून प्रचाराचा अधिकृत कालावधी संपला आहे. मात्र, सरनाईक यांचे प्रचारफलक अद्याप कायम असल्याचे निदर्शनास येत आहे. इतर उमेदवारांकडून प्रचारसाहित्य हटवले जात असताना सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांचे बॅनर मात्र का हटवले जात नाहीत, असा सवाल उपस्थित होत आहे.
सत्ताधारी विद्यमान आमदारच नियमांच्या चौकटीत राहणार नसतील, तर इतरांनी आदर्श कुणाचा घ्यायचा? या बॅनरना आवश्यक परवानग्या आहेत का? प्रचारबंदीच्या काळातील नियमांचा भंग झाला आहे का? याची तातडीने चौकशी करण्याची मागणी पुढे येत आहे.आता सर्वांच्या नजरा निवडणूक प्रशासनाकडे! सरनाईकांच्या प्रचारफलकांवर कारवाई होणार, की हे प्रकरण दुर्लक्षित राहणार?





Total Users : 3648691