बुलढाणा (हॅलो बुलढाणा विशेष) घाटबोरीच्या आरक्षित जंगलातील सागवान वृक्षांच्या अवैध कत्तलीचे प्रकरण आता भलत्याच वळणावर पोहोचले आहे! ज्या सागवान वृक्षतोड प्रकरणाचा ‘हॅलो बुलढाणा’ने सर्वप्रथम जिल्ह्यात पर्दाफाश करून वनविभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते, त्याच प्रकरणात आता एकामागून एक धक्कादायक घडामोडी समोर येत आहेत!आधी वनपाल-वनरक्षकांचे निलंबन, त्यानंतर थेट वनपरिक्षेत्र अधिकारी अंकुश येवले यांच्या निलंबनाचा प्रस्ताव आणि आता आरोपीच्या जबाबातून कथित मुख्य सूत्रधार ‘पुष्पा’चे नाव समोर आल्याची खळबळजनक माहिती! या घडामोडींमुळे वनविभागात एकच खळबळ उडाली आहे.
अमरावतीचे चौकशी पथक थेट मेहकरात!
सध्या अमरावतीहून आलेले विशेष पथक मेहकर येथील वनविभाग कार्यालयात चौकशी करत आहे. तक्रारदार देविदास खंडारे यांनीही पथकासमोर आपली बाजू मांडली. या गुन्ह्यात वापर झाल्याचे सांगितल्या जाणाऱ्या जेसीबी, हायड्रा आणि ट्रकच्या मालकांची कसून चौकशी सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे.
राहुलच्या जबाबात ‘पुष्पा’चे नाव; कोण आहे पडद्यामागचा खेळाडू?
या प्रकरणातील आरोपी राहुल म्हेत्रे यांनी आपल्या जबाबात मुख्य सूत्रधार म्हणून ‘पुष्पा’चे नाव घेतल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली आहे. संबंधित व्यक्ती अद्याप फरार असल्याचेही सांगण्यात येत आहे. मात्र, या दाव्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
आता मोठ्या साहेबांची खुर्ची धोक्यात!
दरम्यान, उपवनसंरक्षक जमीर शेख यांनी RFO अंकुश येवले यांच्या निलंबनाचा प्रस्ताव अमरावतीला पाठविल्याची माहिती वन कर्मचारी संघटनेला दिली. गुरुवारी (१५ ऑक्टोबर) संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांच्या जबाबदारीचा मुद्दा उपस्थित केला. येवले त्याच कार्यक्षेत्रात असल्याने चौकशीवर प्रभाव पडण्याची शक्यता व्यक्त करत त्यांचा पदभार काढण्याची मागणी करण्यात आली.
‘हॅलो बुलढाणा’ने उघडलेले प्रकरण आता निर्णायक वळणावर?
घाटबोरीच्या जंगलातील सागवान वृक्षांच्या अवैध तोडीचा मुद्दा सर्वप्रथम जिल्ह्यासमोर आणत ‘हॅलो बुलढाणा’ने या प्रकरणाला वाचा फोडली होती. जंगलातील मौल्यवान सागवानाची कत्तल, त्यामागील संशयास्पद हालचाली आणि वनविभागाच्या जबाबदारीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या या प्रकरणाने आता वरिष्ठ पातळीवरील चौकशीपर्यंत मजल मारली आहे.
वनपाल-वनरक्षकांवरील कारवाईनंतर आता वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेचीही चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, आरोपीच्या कथित जबाबातून समोर आलेल्या ‘पुष्पा’ या नावामुळे या प्रकरणाला आणखी नवे वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, चौकशी पूर्ण झाल्यानंतरच या नावामागील सत्य स्पष्ट होणार आहे.
सागवानाच्या ओंडक्यांपासून थेट अधिकाऱ्यांच्या खुर्चीपर्यंत… आणखी किती धक्के बसणार?
वनपाल-वनरक्षकांपुरतीच कारवाई थांबणार की वरिष्ठांपर्यंत तपासाचे हात पोहोचणार? सागवान तोडीमागील आर्थिक व्यवहार, वाहनांची भूमिका आणि कथित सूत्रधाराचे नेमके संबंध काय? अमरावतीचे पथक आणखी कोणाचे पितळ उघडे पाडणार?
घाटबोरीच्या जंगलातून सागवान गायब झाले… पण या जंगललुटीचे खरे सूत्रधार कोण? ‘हॅलो बुलढाणा’ने सर्वप्रथम जिल्ह्यासमोर आणलेल्या या प्रकरणाचा तपास आता कोणत्या मोठ्या नावापर्यंत पोहोचणार? मेहकरच्या चौकशीतून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक नव्या माहितीवर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे!






Total Users : 3619038