बुलढाणा (हॅलो बुलढाणा) सुशिक्षित बेरोजगार अभियंता कंत्राटदाराचे नोंदणी प्रमाणपत्र देण्यासाठी ४ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बुलढाणा घटकाने जिल्हा परिषदेतील दोन वरिष्ठ सहाय्यकांविरुद्ध कारवाई केली आहे. विजय प्रल्हाद खर्चे, वय ५२ वर्षे, वरिष्ठ सहाय्यक तथा प्रभार स्वीय सहाय्यक (स्टेनो) अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. बुलढाणा. रा. द्वारका नगर, बुलढाणा. तसेच सुधीर महादेव तांदुळकर, वय ४२ वर्षे, वरिष्ठ सहाय्यक, जि.प. बांधकाम विभाग, बुलढाणा. रा. बजरंग नगर, जुना अजिसपूर रोड, बुलढाणा असे लाचखोरांचे नाव आहे.
२३ वर्षीय खाजगी इंजिनिअर असलेल्या तक्रारदाराने सुशिक्षित बेरोजगार अभियंता कंत्राटदाराचे नोंदणी प्रमाणपत्र मिळण्यासाठी जि.प. बांधकाम विभागात रितसर अर्ज केला होता. हे प्रमाणपत्र देण्यासाठी लिपीक तांदुळकर आणि स्टेनो खर्चे हे ५,००० रुपयांची लाच मागत असल्याची तक्रार त्याने दि. ०१.०४.२०२६ रोजी ACB कडे दिली होती.
▪️पडताळणीत काय निष्पन्न झाले?
दि. ०१. ०४.२०२६ रोजी दुपारी १३.१३ ते १४.०८ दरम्यान पडताळणी केली असता, आलोसे क्र. ०१ खर्चे यांनी त्यांच्या केबिनमध्ये ५,००० रुपयांची लाच मागून स्विकारण्याची संमती दिली. त्याचवेळी आलोसे क्र. ०२ तांदुळकर यांनी तडजोडीअंती ४,००० रुपयांची लाच खर्चे यांच्याकरिता मागणी करून तक्रारदाराला लाच देण्यास प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले.
▪️अशी झाली सापळा कार्यवाही!
दि. ०१. ०४.२०२६ रोजी १५.४६ ते १७.३६ दरम्यान सापळा आयोजित केला असता खर्चे कार्यालयात हजर नसल्याने तांदुळकर यांनी फोनवर बोलण्यास टाळाटाळ केली. संशय आल्याने त्यांनी प्रमाणपत्र कार्यालयाबाहेर आणून दिले व काम झाले असे सांगून लाच स्विकारली नाही. पुन्हा दि. ०२.०६.२०२६ रोजी सापळा आयोजित केला असता खर्चे यांनी “माझ्याकडे तुमची कोणतीच फाईल नाही, मी बाहेर आहे” असे सांगून भेट टाळली. दोन्ही लोकसेवकांनी संपर्क न केल्याने आणि संशय आल्याने लाच स्विकारणार नसल्याची खात्री झाली.
▪️गुन्हा दाखल!
या प्रकरणी पोलीस स्टेशन बुलढाणा शहर येथे अप क्र. १०२३/२०२६ कलम ७, १२ भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अन्वये दि. १६. १०. २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज दि. १६.१०.२०२६ रोजी दोन्ही आरोपींना त्यांच्या कार्यालयातून ताब्यात घेण्यात आले असून अटकेची कार्यवाही सुरू आहे.
▪️या पथकाने केली कारवाई
सापळा अधिकारी – श्री. विलास गुसिंगे, पोलीस निरीक्षक, लाप्रवि बुलढाणा.
पर्यवेक्षक अधिकारी – श्री. भागोजी चोरमले, पोलीस उपअधीक्षक, लाप्रवि बुलढाणा.
पथक – पोहेकॉ प्रविण बैरागी, अमोल झिने, दिपक जाधव, जगदीश पवार, पो.कॉ. लक्ष्मीकांत इंगळे, रतन गिरी, गजानन गाल्डे, शैलेश सोनवणे, पंढरी शेळके, रजिंत व्यवहारे, प्रफुल्ल आमले, चापोकॉ अर्शद शेख या पथकाने मा. श्री. बापू बांगर, पोलीस अधीक्षक, ACB अमरावती परिक्षेत्र आणि मा. श्री. सुनिल किनगे, अपर पोलीस अधीक्षक, ACB अमरावती यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली.
▪️ACB चे आवाहन
नागरिकांना भ्रष्टाचाराबाबत काही माहिती असल्यास किंवा लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास ACB शी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.






Total Users : 3617159