अमरावती (हॅलो बुलढाणा विशेष प्रतिनिधी) निवडणुकीचा बिगुल वाजण्याआधीच पैठण्यांची चर्चा, दोन हजारांच्या नोटांचा विषय आणि थेट पोलिस ठाण्यात पोहोचलेली तक्रार! अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात आमदार किरण सरनाईक यांच्या नावाभोवती पुन्हा एकदा राजकीय वादळ घोंघावू लागले आहे. शिक्षकांचे प्रश्न बाजूला आणि पैठणीचे राजकारण पुढे, अशी चर्चा आता शैक्षणिक वर्तुळात रंगू लागली आहे
१६ सप्टेंबर रोजी अचलपूर येथील राष्ट्रीय हायस्कूलमध्ये शिक्षकांना प्रत्येकी दोन हजार रुपये आणि पैठणी वाटप झाल्याचा मुद्दा थेट पोलिसांपर्यंत पोहोचला आहे. प्रा. अनिल मधुकरराव काळे यांनी किरण सरनाईक यांच्याविरोधात अचलपूर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
पण खरी खळबळ पुढेच आहे!
या संपूर्ण प्रकाराचे सीसीटीव्ही फुटेज आणि ऑडिओ क्लिप उपलब्ध असल्याचे काळे यांनी तक्रारीत नमूद केले आहे. त्यामुळे आता त्या कॅमेऱ्यात नेमकं काय कैद झालं आणि ऑडिओमध्ये कुणाचा आवाज आहे, याकडे लक्ष लागले आहे.
विशेष म्हणजे, मागील शिक्षक मतदारसंघ निवडणुकीतील पैठणी वाटपाचा वाद अद्याप न्यायालयात प्रलंबित असल्याची माहिती समोर येत आहे. जुन्या प्रकरणाचा निकाल लागण्याआधीच नव्या तक्रारीने सरनाईकांच्या राजकीय वाटचालीसमोर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.शिक्षकांना न्याय देण्याची भाषा करणाऱ्यांच्या निवडणुकीत वारंवार पैठणीच चर्चेत का येते? हा प्रश्न आता अधिकच तीव्र झाला आहे.
अचलपूर पोलिसांकडून सीसीटीव्ही आणि ऑडिओची तपासणी झाल्यानंतर नेमके कोणते वास्तव समोर येणार? सरनाईक या प्रकरणावर काय स्पष्टीकरण देणार? पैठणीचा पदर उलगडणार की सीसीटीव्हीमधून राजकीय भूकंप घडणार? अमरावतीच्या शिक्षक निवडणुकीतील पुढचा अंक ठरणार निर्णायक!






Total Users : 3618696