बुलढाणा (हॅलो बुलढाणा) मलकापूर आणि नांदुरा परिसरात वीज वाहिन्यांची तार चोरणाऱ्या टोळीने धुमाकूळ घातला असून गेल्या काही दिवसांत तब्बल ३०० किलोमीटर लांबीची वीज वाहिनींची तार चोरून नेण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकारामुळे महावितरणचे १ कोटी ८ लाख रुपयांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले असून परिसरातील शेतकरी व सामान्य ग्राहकांचा वीज पुरवठा विस्कळीत झाला आहे.
या गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी प्रशासकीय कारवाईसोबतच परिसरातील नागरिकांच्या ‘सोशल पोलीसिंग’ची मोठी गरज असल्याचे आवाहन कार्यकारी अभियंता रत्नदिप तायडे यांनी केले आहे. दुष्काळसदृश परिस्थितीतही सुरळीत वीज पुरवठा देण्यासाठी महावितरण कटिबद्ध असून त्यासाठी सर्व आवश्यक तांत्रिक व प्रशासकीय उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, चोरट्यांनी मलकापूर परिसरात १५० किलोमीटर आणि नांदुरा परिसरात १५० किलोमीटर अशा एकूण ३०० किलोमीटर लांबीच्या तारांवर लांबवल्या आहेत. या चोरीमुळे अचानक ठप्प झालेला वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणकडून प्राधान्य क्रमाने दुरुस्ती व पुनर्बांधणीची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.
याप्रकरणी महावितरणने आतापर्यंत विविध पोलीस ठाण्यांत ८९ वेळा गुन्ह्यांची नोंद केली आहे. पोलीस प्रशासनाकडूनही या टोळीचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत असून काही ठिकाणी त्यांना यशही मिळाले आहे. परंतु, महावितरणची वीज यंत्रणा अत्यंत दूरवर आणि ग्रामीण भागात पसरलेली असल्याने केवळ महावितरण आणि पोलिसांच्या बळावर यावर पूर्णपणे नियंत्रण मिळवणे आव्हानात्मक ठरत आहे.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत मुख्य अभियंता दत्तात्रय बनसोडे आणि कार्यकारी अभियंता रत्नदीप तायडे यांनी नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले आहे.
▪️संशयास्पद हालचाल आढळल्यास यंत्रणेशी संपर्क करा..!
आपल्या परिसरात वीज यंत्रणेशी संबंधित कोणतीही संशयास्पद हालचाल अथवा चोरीचा प्रकार आढळल्यास, एक सामाजिक जबाबदारी म्हणून तात्काळ महावितरण किंवा पोलीस प्रशासनाला माहिती द्यावी, जेणेकरून या टोळीचा लवकरात लवकर बंदोबस्त करता येईल आणि शेतकरी व नागरिकांना अखंडित वीज पुरवठा मिळण्यास मदत होईल.




Total Users : 3595561