बुलढाणा (हॅलो बुलढाणा) अन्नदाता दुष्काळाच्या झळा सोसत असताना उत्सवावर खर्च करायचा कसा? या प्रश्नाला कृतीतून उत्तर देत बुलढाण्याच्या अग्निज्वाला सांस्कृतिक उत्सव समितीने यंदाचा उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. आयोजनासाठी होणारा खर्च टाळून ती रक्कम दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या मदतीसाठी वापरण्यात येणार आहे.
दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या बळीराजाच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार समितीने व्यक्त केला. दरवर्षी उत्सवासाठी देणगी देणाऱ्या दानशूरांनी यंदा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी योगदान द्यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. समिती स्वतः जमा करणार असलेला निधीदेखील उत्सवाऐवजी शेतकरी बांधवांसाठी वापरणार आहे.
“आई भगवतीवरील श्रद्धा अढळ आहे; संकटातील अन्नदात्याला आधार देणे हीच माणुसकी आणि सेवाभावाची खरी उपासना,” अशी भावना समितीने मांडली. श्रद्धेसोबत सामाजिक बांधिलकी जपण्याच्या भूमिकेतून हा निर्णय घेतल्याचे समितीने स्पष्ट केले.
उत्सव पुढच्या वर्षीही होईल; संकटातील शेतकऱ्याला आधार मात्र आजच हवा!
इतर सार्वजनिक मंडळे, सामाजिक संस्था आणि दानशूरांनीही मदतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन समितीने केले आहे.या निर्णयाची माहिती ऋषभ साळवे, शैलेश खेडेकर, अभिषेक गुप्ता, आदित्य देशमुख, अमन चव्हाण, प्रतीक गावंडे, पवन काकडे, आदित्य साळवे व प्रमुख कार्यकारिणीने दिली. देणगीदारांच्या विश्वासाचा सन्मान राखत त्यांच्या सहकार्याला सामाजिक सेवेची दिशा देण्याचा संकल्पही समितीने व्यक्त केला. बळीराजाच्या शेतात पुन्हा हिरवळ फुलावी आणि शेतकरी कुटुंबांच्या आयुष्यात सुखाचे दिवस परतावेत, अशी प्रार्थना समितीने केली.




Total Users : 3594750