मेहकर (हॅलो बुलढाणा) योजना आहेत, पण नळाला पाणी कधी? मेहकर तालुक्यात रखडलेल्या जल जीवन मिशन योजनांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे जिल्हा महासचिव प्रशांत पाटील यांनी सहकाऱ्यांसह पंचायत समितीसमोर सुरू केलेल्या बेमुदत साखळी धरणे आंदोलनानंतर प्रशासनाने हालचाली केल्या आहेत. आठ गावांतील दुरुस्तीची कामे सुरू असून, पुढील पाच ते सहा दिवसांत प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी आंदोलनाला भेट दिल्यानंतर त्यांच्या निर्देशानुसार अधिकारी आणि संबंधित कंत्राटदारांची बैठक झाली. कंत्राटदारांनी योजनांच्या भौतिक व आर्थिक प्रगतीचा लेखाजोखा मांडला. अडचणींचा पाढा वाचणाऱ्या अधिकारी आणि ठेकेदारांना पाटील यांनी धारेवर धरत पाणीपुरवठ्याची ठोस मुदत मागितली.
लोणी गवळी, घाटबोरी आणि अंजनी बु. येथील योजनांचे कंत्राटदार बालाजी बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे संचालक जितू सावजी बैठकीला गैरहजर राहिल्याने त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
उर्वरित गावांचा पाणीपुरवठा महिनाभरात सुरू करण्याचे लेखी पत्र आणि आमदार सिद्धार्थ खरात यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष किशोर गारोळे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी व शेकडो नागरिक उपस्थित होते.




Total Users : 3591596