spot_img
spot_img

जामोद थिरकले, स्त्रीशक्ती चमकली! ६०० हून अधिक महिलांचा गरब्यात जल्लोष; ज्योती अन् वृषाली ‘गरबा क्वीन’, वैष्णवी ठरली ‘गरबा प्रिन्सेस’!

जामोद (हॅलो बुलढाणा/ ज्ञानदेव राजनकर) गरब्याचा ठेका, उत्साहाची उधळण अन् स्त्रीशक्तीचा दमदार आविष्कार! मीनल समाधान दामधर फ्रेंड्स ग्रुपच्या वतीने आयोजित ‘जामोद महिला गरबा महोत्सव २०२६’मध्ये ६०० हून अधिक मुली व महिलांनी सहभाग नोंदवत सांस्कृतिक उत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शुक्रवार, ९ ऑक्टोबर रोजी निःशुल्क गरबा वर्कशॉप व भव्य महिला गरबा इव्हेंट उत्साहात पार पडला.

महोत्सवात ज्योती अनिल धुरडे व वृषाली दिनेश धुरडे यांनी संयुक्तपणे ‘गरबा क्वीन’चा किताब पटकावला. वैष्णवी पांडुरंग केदार ‘गरबा प्रिन्सेस’ ठरली, तर सुरेखा प्रदीप बोबडे यांना ‘बेस्ट ड्रेसिंग’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

सरपंच गंगुबाई पुंडलिकराव दामधर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. स्वातीताई वाकेकर यांच्या हस्ते झाले. वर्षाताई वाघ, कविताताई ढगे, नगरसेविका वैशालीताई तायडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

गरबा प्रशिक्षिका माधुरी दातीर यांनी चार दिवस निःशुल्क प्रशिक्षण देत महिलांना विविध स्टेप्स, ताल आणि सादरीकरणाचे मार्गदर्शन केले. त्यानंतर चार वयोगटांतील स्पर्धेत सहभागी महिलांनी आपल्या कलागुणांची छाप पाडली.

“स्त्रीशक्ती कोणतेही आव्हान स्वीकारण्यास समर्थ आहे,” असा विश्वास डॉ. वाकेकर यांनी व्यक्त केला. “गरबा म्हणजे महिलांचा आत्मविश्वास, मैत्री, स्वाभिमान आणि एकतेचा उत्सव,” असे आयोजिका मीनल दामधर म्हणाल्या. प्रशिक्षणापासून सादरीकरणापर्यंत महिलांना व्यासपीठ देणाऱ्या या उपक्रमाने जामोदच्या सांस्कृतिक उत्सवात स्त्रीशक्तीचा ठसा उमटवला!

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!